नाशिक : नगरसूलमध्ये आजपासून नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी

nagarsul www.pudhari.news

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील नगरसूल येथे पुरातन हनुमान मंदिर, शनिमहाराज व सावता महाराज मंदिर जीर्णोेद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कळस, ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त नगरसूल मारुती मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार (दि. 9)पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे नगरसूलमध्ये पुढील आठवडाभर राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी राहणार आहे.

या सप्ताहात दररोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सायंकाळी 5.30 ते 6.30 हरिपाठ रात्री 7 ते 9 कीर्तन व रात्री 9 ते 10 महाप्रसाद होणार आहे. दि. 9 रोजी कीर्तनकेसरी अक्रुर महाराज साखरे गेवराई यांचे, दि.10 रोजी अनिल महाराज पाटील बार्शीकर, दि. 11 रोजी ज्ञानेश्वर महाराज कदम आळंदी देवाची, दि. 12 रोजी प्रकाश महाजन साठे बीड, दि. 13 रोजी महंत अमृतदास महाराज जोशी बीड, दि. 14 रोजी भागवताचार्य केशव महाराज उखळीकर परळी, दि. 15 रोजी अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले पंढरपूर यांचे, तर दि. 16 मे रोजी पांडुरंग गिरी महाराज वावीकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. तत्पूर्वी दि. 15 रोजी सद्गुरू प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व तिन्ही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक म्हणून ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष निकम, सचिव मारुती अभंग, नगरसूलच्या सरपंच मंदाकिनी पाटील आदींसह विश्वस्त व ग्रामस्थ मंडळींनी नियोजन केले आहे. मंदिरांसाठी देणगी देण्याचे आवाहन अध्यक्ष सुभाष निकम यांनी केले आहे.

सप्ताहात गायनाची मेजवानी
सप्ताहात महागायनाचार्य महेश्वरजी महाराज आळंदी, गायनाचार्य कोमलसिंग महाराज राजपूत धुळे, गायनाचार्य कुंदन महाराज बोरसे, गायनाचार्य माधव महाराज पैठणकर नगरसूल, मृदंगाचार्य दिनेश महाराज मोजाड नाशिक, मृदंगाचार्य श्रीहरी दादा भगुरे आळंदी यांचे गायन होईल. ज्ञानबोधाई भजनानंदी केंद्र समस्त विद्यार्थी परिवार भजन साथ करणार आहे.

nagarsul www.pudhari.news
नगरसूल

तीनशे वर्षांची पुरातन मूर्ती
नगरसूल गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिर हे पुरातन असून, हनुमान मूर्ती ही साधारणत: तीनशे वर्षांपूर्वीची आहे. मूर्ती शिळा एकजीव असल्याने त्यावर पूर्वीपासून शेंदूर लावला जात असल्याने हा शेंदूर काढण्याचे कार्य नगरसूलचे मूर्तिकार नारायण कुडके यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : नगरसूलमध्ये आजपासून नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी appeared first on पुढारी.