
नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील नगरसूलसह परिसरात बेमोसमी पावसाने पुन्हा १४ ते १६ मार्चपर्यंत विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना उभ्या कांदा पिकासह अन्य पिकांची चिंता सतावत असून, बळीराजा मेटाकुटीला आला आहे. परिसरात ४ ते ७ मार्चदरम्यानही अवकाळी पावसासह गारपीट झाली. शासनाच्या तोंडी आदेशावरून कामगार तलाठी व कृषी सहायक यांनी शेतकऱ्यांशी फोनवरून विचारपूस केली. मात्र, नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही पिकांच्या प्रत्यक्ष पंचनाम्यापासून वंचितच आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण, थंड हवामान, पाऊस असल्याने शेतकरी गुरांना निवारा बांधताना दिसत आहेत. पावसाने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने पिकांवर परिणाम केला असून, उभ्या गव्हासह काढणीला आलेला रांगडा कांदा, उन्हाळ कांदा, डोंगळे, भाजीपाला पिकांवर परिणाम झाला असून, कांदा पीक या पावसाने सडण्याची शक्यता नगरसूलचे माजी सरपंच, महानंदाचे माजी संचालक सुभाष निकम यांनी व्यक्त केली आहे. विजांच्या कडकडाटात कोसळणाऱ्या टपोऱ्या थेंबांमुळे गव्हाच्या ओंब्या फुटल्या. कांद्याचे डोंगळेही फुटले. काही भागांत पावसाचा जोर जास्त असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. काढणीला आलेला उन्हाळ कांद्याच्या कोंबात पावसाचे पाणी गेल्याने व वाफ्यात पाणी साचल्याने कांदा सडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होऊन रात्री पावसानेही हजेरी लावली. यामुळे परिसरातील उभ्या गहू पिकाचे नुकसान झाले. रात्रभर पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी हताशपणे पाहत होता. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. पिकांसह मानवी आरोग्यासही हे वातावरण अपायकारक झाल्याने मुलांसह मोठी माणसे खोकला, सर्दीने जाम झाले आहेत. शासनाने तत्काळ पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
हेही वाचा:
- नाशिक : अवकाळीचा द्राक्षबागांना फटका; वादळी वाऱ्यासह गारपीट
- बारामती : अवकाळीच्या धास्तीने गहू काढणीला वेग
- Rainfall forecast : हवामान विभागाचा अंदाज ठरतोय खरा; राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी
The post नाशिक : नगरसूलसह परिसरात अवकाळीची पुन्हा हजेरी appeared first on पुढारी.