नाशिक : नदीसंवर्धन शिवार फेरीतून ‘आळंदी’ नदीचे चिंताजनक वास्तव समोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनवाहिनी व गोदावरीची प्रमुख उपनदी म्हणून ओळखल्या जाणार्‍या आळंदी नदीलाही प्रदूषणाचा विळखा पडला असल्याचे चिंताजनक वास्तव आळंदी संवर्धन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या नदीसंवर्धन शिवार फेरीतून समोर आले आहे. नदीपात्रात अनेक ठिकाणी साचलेल्या गाळामुळे प्रवाह मार्गात अडथळे निर्माण झाले असून, काही ठिकाणी सांडपाणी मिसळले जात असल्याचेही यावेळी दिसून आले. नदीच्या डाव्या आणि उजव्या बाजूने घातलेल्या संवर्धन प्रदक्षिणा मार्गातील प्रत्येक गावांतील गावकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

या शिवार फेरीमध्ये दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथील सरपंच पुंडलिक वाघेरे व उपसरपंच भरसट यांनी आळंदी नदीचे उगमस्थान, येथील जैवविविधता आणि उगमाची भौगोलिक रचना, इतिहास या विषयी ठळक माहिती समितीस दिली. या ठिकाणी वन्यजीवांकरिता पाणवठ्याची सोय व्हावी म्हणून छोटेखानी तळे व्हावे, अशी गरज असल्याचे सांगितले. पुढे कोचरगावचे सरपंच टोंगारे व उपसरपंच लिलके यांनी गावकर्‍यांच्या सभेचे आयोजन करत समितीस नदीची संवर्धन आणि संरक्षण याविषयी गावाचे उद्बोधन करण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कोचरगाव येथून नदी आळंदी धरण क्षेत्रात विलीन होते. येथे मोठ्या प्रमाणात गाळाचे थर साचल्याने नदी प्रवाहास अनंत अडथळे येत असल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. पुढे करवंदेवाडी गावात ग्रामपंचायत सदस्या स्वाती राजेंद्र करवंदे यांनी ‘आळंदी धरण स्वच्छता’ हा विषय गावकर्‍यांसमोर मांडण्याकरिता ग्रामसभेचे आयोजन केले. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते राजाराम कसबे यांनी ‘सदैव नदी लोकजागृती चळवळ’ सुरू असल्याचे सांगितले.

वाडगाव शिवारातून नदीचा मार्ग मुंगसरे या गावाजवळून प्रवाहित होतो. गावातून काही प्रमाणात सांडपाण्यावर नियोजन करणे गरजेचे असल्याचे दिसून आले. पुढे यशवंतनगरजवळ या नदीला बि—टिशकालीन बंधारा लागतो. जो आज पूर्ण गाळाने भरलेला असून, त्याचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे. अनेक गावांची तृष्णा भागवत दक्षिणवाहिनी आळंदी नदी अचानक पश्चिमवाहिनी होते.

30किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून अखेर ती जलालपूर शिवारात गोदावरी नदीच्या गर्भात विलीन होत याच ठिकाणी नदीचा संगम होतो.जलालपूरचे पोलिसपाटील मोहिते यांनी सांगितले की, या ठिकाणी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित असून, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या शिवार फेरीमध्ये सामाजिक कार्यकर्ते रमेश अय्यर, गोदावरी गटारीकरणविरोधी मंचचे निशिकांत पगारे, खगोल अभ्यासक अ‍ॅड. मिलिंद बाबर, दुर्ग अभ्यासक डॉ. अजय कापडणीस, नंदिनी नदीचे प्रा. सोमनाथ मुठाळ, वरुणा नदीचे सुनील परदेशी व राहुल जोरे, आयोजक नंदिनी नदी समन्वयक तुषार पिंगळे, अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, पत्रकार सुरेश भोर यांच्यासह सहकारी उपस्थित होते.

नदी म्हणजे केवळ वाहणारे पाणी, त्यातील माती, दगड, वाळू नव्हे, तर नदीतील जलचर, वनस्पती, नदीवर अवलंबून असणारे काठावरील जनजीवन, पशू, पक्षी या सर्वांच्या शिस्तीने बसवलेल्या नैसर्गिक व्यवस्थेलाच नदी म्हटले जाते. नद्यांच्या या व्यवस्था गावपातळीवर चांगल्या स्थितीत आहे. परंतु, शहरीकरणात नद्या व उपनद्या या प्रदूषित व अतिक्रमित होण्यास सुरुवात होते. यात सर्वच घटकांनी सकारात्मक भूमिका घेत प्रामुख्याने बदल होणे आवश्यक आहे.
– निशिकांत पगारे, गोदावरी गटारीकरणविरोधी मंच, नाशिक

हेही वाचा :

The post नाशिक : नदीसंवर्धन शिवार फेरीतून ‘आळंदी’ नदीचे चिंताजनक वास्तव समोर appeared first on पुढारी.