नाशिक : नवीन शाहीमार्गावरील झोपड्या हटविण्यास महिलांचा विरोध

पंचवटी www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

म्हसोबा पटांगणाशेजारील नवीन शाहीमार्गावरील अतिक्रमण काढण्यास स्थानिक महिलांनी विरोध केल्याने अतिक्रमण निर्मूलन पथकाला रित्या हाती परतावे लागले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेले झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी सोमवारी ( दि. १२) दुपारी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक गेले होते.

नवीन शाहीमार्गावर गेली कित्येक महिन्यांपासून अतिक्रमण होत असताना त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे येथील झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. स्मार्ट सिटीच्या या स्मार्ट आणि ऐतिहासिक रस्त्यावर असलेल्या या झोपड्यांमुळे स्मार्ट सिटी नक्की कुठे आहे, असा प्रश्न येथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना पडला आहे. मोठ्या प्रमाणात वाढू लागलेले अतिक्रमण काढण्यासाठी पथकाने सोमवारचा मुहूर्त काढला. पोलिस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ताफा या परिसरात पोहोचला. स्वतःहून झोपड्या हटवून तेथील साहित्य हलविण्यास तेथील लोकांना सांगण्यात आले. मात्र आम्ही येथून हलणार नाही, आमचे साहित्यही उचलू देणार नाही, अशी भूमिका या झोपडपट्टीवासीयांनी घेऊन एक प्रकारे अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकास आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. पथकाने कारवाईस सुरुवात केली असता काही महिलांनी स्वतःहून झोपडीतील साहित्य पथकाच्या वाहनात फेकण्यास सुरुवात केली. कारवाईसाठी पुढे जाणाऱ्या वाहनावर चढण्याचा आणि वाहनाच्या पुढे लोटांगण घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी ओढून खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र हतबल झालेल्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर कारवाईविना परत फिरण्याची नामुष्की ओढावली. यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी मनपा सहायक आयुक्त नितीन नेर, पंचवटी विभाग अधिकारी कैलास राभडिया, पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, पंचवटी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रवीण बागूल आदी अधिकारी, कर्मचारी, पोलिस उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : नवीन शाहीमार्गावरील झोपड्या हटविण्यास महिलांचा विरोध appeared first on पुढारी.