नाशिक : नवीन सभासदांना विरोध नाही-अ‍ॅड. नितीन ठाकरे : परिवर्तनच्या पत्रकार परिषदेत माहिती

नितीन ठाकरे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मविप्र संस्थेत काही वारसा सभासद नोंदविताना चुकीच्या मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे. संमतीपत्रावर इतर वारसांच्या खोट्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या आहेत. विशेषत: जिल्ह्याबाहेरील सभासदांबाबत हे प्रकार घडले आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. या बोगस सभासदांना विरोध आहे. सरसकट नवीन सभासदांना विरोध नाही, अशी माहिती परिवर्तन पॅनलचे नेते अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी दिली.

शहरात पार पडलेल्या परिवर्तन पॅनलच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, प्रा. नानासाहेब दाते, अशोक पिंगळे आदी उपस्थित होते. परिवर्तन पॅनलच्या नेत्यासह उमेदवारांनी प्रचारानिमित्त संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे. त्यामुळे यंदा मविप्र संस्थेत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास अ‍ॅड. ठाकरे यांनी व्यक्त केला.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सत्ताधार्‍यांविरोधात आरोपाची राळ उठविली जात आहे. मात्र, त्यांच्याकडून समर्पक उत्तर दिले जात नाही. त्यामुळे सत्ताधार्‍यांना गैरकारभार मान्य असल्याचे म्हणावे लागेल. सत्ताधार्‍यांच्या आरोपांना पुराव्यानिशी उत्तर दिले जात आहे. आता निवडणूक सभासदांनी हाती घेतली. त्यामुळे ते अपप्रचाराला बळी पडणार नसल्याचे आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. गेली पाच वर्षे मविप्र संस्थेत 40 पत्रे देऊनही त्यावर उत्तरे मिळाली नाहीत. डोनेशनच्या नावावर जमा झालेले कोट्यवधी कुठे गेले? असा सवाल प्रा. दाते यांनी उपस्थित केला.

मुरकुटे, देवरेंची माघार
शुक्रवारी (दि.26) देवळा तालुक्यातील अपक्ष उमेदवार केवळ देवरे व सिन्नरमधील अपक्ष उमेदवार अशोक मुरकुटे यांनी माघार घेत परिवर्तन पॅनलला पाठिंबा असल्याचे पत्र अ‍ॅड. नितीन ठाकरे यांना दिले. प्रत्येकाच्या मनात परिवर्तन करण्याचे ध्येय स्पष्ट आहे. रविवारी ते मतात रूपांतर होणार असल्याचे अ‍ॅड. ठाकरे यांनी प्रचार दौर्‍यात सांगितले. दिवसभरात आडगाव, मखमलाबाद, गिरणारे, देवळाली कॅम्प येथे परिवर्तन पॅनलचे मेळावे झाले.

हेही वाचा :

The post नाशिक : नवीन सभासदांना विरोध नाही-अ‍ॅड. नितीन ठाकरे : परिवर्तनच्या पत्रकार परिषदेत माहिती appeared first on पुढारी.