नाशिक : नव्या घंटागाड्या दिवाळीपूर्वी धावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या नवीन घंटागाड्या दिवाळीपूर्वी रस्त्यावर येणार आहेत. 396 घंटागाड्यांद्वारे घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जाणार आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास केल्यानंतर तसेच करारनामे व सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून शहरातील सहाही विभागांमध्ये घंटागाड्या सुरू करण्यास हिरवा कंदील दिला आहे.

घंटागाडी ठेक्यात काही जुन्या ठेकेदारांनाच काम देण्याचे आरोप झाले होते. त्यानंतर सीएनजी वाहनांची संख्या कमी करणे तसेच इलेक्ट्रिक वाहनांची अट वगळली गेल्यामुळे संशय निर्माण झाला होता. निविदा प्रक्रिया सुरू असताना अचानक जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढ देण्यासाठी स्थायी समितीच्या 10 हून अधिक सदस्यांनी पत्र दिल्यामुळे त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला होता. हा वाद मिटत नाही, तोच काही ठेकेदारांनी अनुभवाचे संशयास्पद दाखले दिल्यामुळे गुजरातसारख्या राज्यातील महापालिकेकडून त्याची पडताळणी करावी लागली. बर्‍याच भवती न भवतीनंतर सहा विभागांत अंतिम ठेकेदार मे महिन्यात नियुक्त झाले. मात्र, त्यांना जवळपास 11 महिने उलटत आले, तरी कार्यारंभ आदेश मिळू शकले नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तब्बल तीन आयुक्त लाभले. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने अभ्यासामध्ये वेळ वाया घालविल्यामुळे जुन्या ठेकेदारांना तब्बल 11 महिन्यांची मुदतवाढ मिळाली.

सोमवारी प्रत्येक घंटागाडीची तपासणी केली जाणार असून, 396 घंटागाड्यांची फिजिबिलिटी तसेच जीपीएस ट्रॅकिंग व अन्य सुविधांची तपासणी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड व यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता बाजीराव माळी हे संयुक्तरीत्या करणार आहेत. त्यानंतर उर्वरित दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व प्रक्रिया अंतिम केली जाईल व दिवाळीपूर्वी शहरात नवीन घंटागाडीद्वारे केरकचरा संकलन केले जाईल.
– डॉ. आवेश पलोड, संचालक,
घनकचरा व्यवस्थापन विभाग, मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : नव्या घंटागाड्या दिवाळीपूर्वी धावणार appeared first on पुढारी.