नाशिक : नांदगाव नगरपरिषद हद्दवाढीचा शासनाकडे अभिप्राय दाखल; सहा ग्रामपंचायतींचा सहभागासाठी आमदार कांदेंचा आग्रह

नांदगाव नगरपरिषद www.pudhari.news

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव नगरपरिषद हद्दवाढीचा अभिप्राय शासनाकडे दाखल झाल्याने नांदगाव नगरपरिषदेच्या हद्दवाढीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

भविष्यातील विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेत, तालुक्यातील सहा गावांचा नगर परिषद हद्दीत समाविष्ट करण्याचा वर्षाच्या शेवटी नगर परिषदेने केलेल्या ठरावाला नव्या वर्षाच्या प्रारंभीच मूर्त स्वरूप येण्याची शक्यता आहे. गंगाधरी, मल्हारवाडी, गिरणानगर, श्रीरामनगर, फुलेनगर, क्रांतीनगर या सहा ग्रामपंचायतींचा नांदगाव नगर परिषदेत सहभाग व्हावा, असा स्पष्ट अभिप्राय नाशिकचे सहआयुक्त (नगरपालिका) यांनी कक्ष अधिकारी नगरविकास विभाग मंत्रालय, मुंबई यांना लेखी कळविला असल्याने नांदगाव नगर परिषदेच्या हद्दवाढीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नवीन वर्षात नांदगाव शहराची हद्दवाढ होऊन उत्पन्नवाढीसह शहर विकासाचा रथ दौडणार आहे.

शहराची हद्दवाढ होऊन अवतीभोवती असलेल्या ग्रामपंचायतीचा शहरात समावेश करून चांगला विकास साधता येईल या हेतूने आ. सुहास कांदे यांनी हद्दवाढीची आग्रही भूमिका घेतली. सरत्या वर्षात गंगाधरी, मल्हारवाडी, गिरणानगर, श्रीरामनगर, फुलेनगर, क्रांतीनगर या सहा ग्रामपंचायतींचा समावेश नगरपरिषदेत करण्याचा ठराव केला होता. त्यासंबंधी तसे पत्र संबंधित सहा ग्रामपंचायतींना देण्यात येत हद्दवाढीसाठी संदर्भात माहिती देण्यात आली होती. मात्र गंगाधरी, मल्हारवाडी, क्रांतीनगर, फुलेनगर या चार ग्रामपंचायतींनी नगर परिषद हद्दीत येण्यास तात्त्विक विरोध दर्शविला होता. गिरणानगर, श्रीरामनगर यांनी नगर परिषद हद्दीत समाविष्ट होण्यासाठी ठराव संमत केला होता. परंतु या ग्रामपंचायती नगरपरिषदेत हद्दीत आल्यास नगर परिषदेचे उत्पन्नवाढीस मदत होऊन शहराचा विकास साधता येणार आहे. दरम्यान गंगाधरी, मल्हारवाडी, गिरणानगर, श्रीरामनगर, फुलेनगर, क्रांतीनगर यासह ग्रामपंचायतींच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या असून, सरपंचपदासह सदस्य मंडळाचा कार्यकाळ नव्याने सुरू झाला आहे. तसा अभिप्रायही या पत्रात देण्यात आला आहे. त्यामुळे हा कार्यकाळ संपेपर्यंत हद्दवाढीची वाट बघितली जाणार की शहर विकासाच्या दृष्टिकोनातून हद्दवाढीसाठी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात आणला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नांदगावचा विकास करताना क्षेत्रफळाची अडचण दूर करण्यासाठी एक वर्षभरापासून प्रयत्न केले जात होते. त्याला यश मिळाले असून, भविष्यात हद्दवाढ झाल्यास नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ होऊन शहराच्या विकासात भर पडणार आहे. विकासाच्या नव्या योजना राबविण्यासाठी हद्दवाढ गरजेचे होते. – सुहास कांदे, आमदार, नांदगाव.

हेही वाचा:

The post नाशिक : नांदगाव नगरपरिषद हद्दवाढीचा शासनाकडे अभिप्राय दाखल; सहा ग्रामपंचायतींचा सहभागासाठी आमदार कांदेंचा आग्रह appeared first on पुढारी.