नाशिक : नांदूरमधमेश्वरला किलबिलाट वाढला, ३३ हजार पक्ष्यांचे आगमन

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या तसेच रामसरचा दर्जा प्राप्त झालेल्या नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभारण्य अर्थात पक्षितीर्थ येथे स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांची मांदियाळी दिसून येत आहे. नुकत्यात पार पडलेल्या प्रगणनेत तब्बल ३३ हजार पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजारांहून अधिक पक्ष्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे अभयारण्यातील किलबिलाट वाढला आहे.

दरवर्षी नांदूरमधमेश्वर अभयारण्यात देश-विदेशातील हजारो पक्ष्यांचे आगमन होत असते. युरोप, सायबेरिया, उत्तर अमेरिका, शेजारील आशियाई देशांतून पक्ष्यांचे स्थलांतर मोठ्या संख्येने सुरू असते. साधारणत: सप्टेंबरअखेरपासून देश-विदेशी पक्षी नांदूरमधमेश्वरमध्ये दाखल होत असतात. यंदाच्या वर्षी सर्वदूर पाऊस झाला असून, पावसाने उघडीप घेतल्याने स्थालांतरित पक्ष्यांचा प्रवास नांदूरमधमेश्वरच्या दिशेने सुरू झाला आहे. सध्या उघड्या चोचीचा बगळा, वारकरी, जांभळा बगळा, राखी बगळा, प्रॅटिन्कोल, कमळपक्षी, शेकाट्या, नदी सुरय आदी देशातील स्थलांतरित पक्ष्यांसह मार्श हरियर, स्पून बिल, स्पॉट बिल, गढवाल आदी निवडक विदेशी पक्ष्यांचे दर्शन होत आहे.

वन्यजीव विभागाकडून सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, मधमेश्वर गोदावरी पात्र, कोठुरे, कुरूडगाव, काथरगाव आदी सात केंद्रांमध्ये पक्षी निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये ५५ प्रजातींचे ३० हजार १७७ पाणपक्षी, तर ३ हजार २०८ झाडांवरील तसेच गवताळ भागातील पक्षी असे एकूण ३३ हजार ३८५ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी याच कालावधीत २७ हजार २८५ पाणपक्षी, तर २ हजार ८६७ झाडांवरील तसेच गवताळ भागातील पक्षी असे एकूण ३० हजार १५२ पक्षी आढळून आले होते.

पर्यटकांची वाढती पसंती

नांदूरमधमेश्वरचे जलाशय पाणथळ असल्याने देशी-विदेशी पक्ष्यांची संख्या लक्षणीय असते. देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी बघण्यासाठी वन्यजीव अभ्यासकांसह पर्यटकही उत्सुक असतात. यंदाही देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन झाल्याने पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या हंगामात ३ हजार ६३० पर्यटकांनी नांदूरमधमेश्वरला भेट दिली आहे. त्यामुळे स्थानिक अर्थकारणालाही गती मिळाली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : नांदूरमधमेश्वरला किलबिलाट वाढला, ३३ हजार पक्ष्यांचे आगमन appeared first on पुढारी.