नाशिक : नांदूरशिंगोटे येथे उद्या लोकनेते गोपीनाथ मुंडे लोकार्पण सोहळा

नांदूर शिंगोटे www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
नांदूरशिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक, पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शनिवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता होणार्‍या कार्यक्रमास तीस ते पस्तीस हजारांवर नागरिक येणार आहेत. त्या दृष्टीने आसन व्यवस्था करण्यात येत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण सोहळा होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित राहणार आहेत.

नांदूरशिंगोटे येथे गावालगत दोन एकराच्या तळ्यात आकर्षक स्मारक उभे राहिले आहे. तळ्यात साठवणीचे पाणी राहत होते. या तळ्यालाच आकर्षक रूप देण्यात आले आहे. तळ्याच्या मध्यभागी गोपीनाथ मुंडे यांचा 16 फूट उंचीचा ब्राँझचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, तळ्याभोवती 400 मीटरचा जॉगिंग ट्रॅक, बगीचा, परिसरात झालेली सुशोभीकरणाची कामे यामुळे स्मारकाला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. युवानेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभे राहिले. त्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, नाईक संस्थेचे हेमंत धात्रक यांचे मार्गदर्शन लाभले. लोकनेते गोपीनाथ मुंडे पुतळा लोकार्पण सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आमदार वाजे यांनी बैठकीत केले आहे. दरम्यान, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून डुबेरे येथे शिवरायांचा अश्वारुढ पुतळा शिवजयंतीला उभारण्यात आला. त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. निमगाव देवपूर येथे अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळा उभारणीचे काम सुरु आहे. तसेच नांदूरशिंगोटेह व गोंदे येथे सुसज्ज बुध्दविहार उभारण्यात आले आहे. धोंडवीरनगर येथे म. फुले यांचा ब्राँझ पुतळा बसविण्यात आला आहे.  त्याच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून शनिवार, दि. 18 मार्च  हा सोहळा सकाळी दहा वाजता पार पडणार आहे.

15 दिवसांत जिल्ह्यात 100 जनजागृती बैठका
सोहळ्याबाबत गावागावात माहिती व्हावी याकरीता एक दिवस लोकनेत्यासाठी या शीर्षकाखाली नियोजन व जनजागृती बैठका घेण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात 15 दिवसात वेगवेगळ्या गावांतील नागरिकांच्या 100 बैठका घेण्यात आल्या. अजूनही 20 अधिक बैठका घेण्यात येणार आहेत. सोहळा देखण्या स्वरूपाचा पार पाडण्यासाठी युवा नेते उदय सांगळे यांच्याकडून बैठकांत जनजागृती केली जात आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव आदी तालुक्यांतही बैठका घेण्यात आल्या आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : नांदूरशिंगोटे येथे उद्या लोकनेते गोपीनाथ मुंडे लोकार्पण सोहळा appeared first on पुढारी.