
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रात्रभर कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न वाजवत, सायलेंसरचा आवाज करीत वेगाने वाहने चालवणाऱ्या रायडर्सवर शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मंगळवारपासून (दि.२०) रात्री ९.३० ते १२ या वेळेत शहरात सर्वत्र ही कारवाई केली जात असून, पहिल्या दिवशी पोलिसांनी २६ वाहने जप्त केली. त्याचप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या सहा हजार ३०८ वाहनधारकांकडून डिसेंबरमध्ये ३१ लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहरात काही चालक दिवसा व रात्री भरधाव वाहने चालवत स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात. वाहनांना कर्णकर्कश हॉर्न बसवणे, सायलेंसरमध्ये फेरफार करून फटाके फोडण्यासारखे आवाज करीत नागरिकांच्या कानठळ्या बसवतात. ट्रिपल सीट वाहने चालवणाऱ्यांचेही प्रमाण वाढलेले आहे. ही बाब पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मंगळवारपासून विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली. त्यात पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी करून बेदरकार पद्धतीने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. ट्रिपल सीट, भरधाव वाहने चालवणाऱ्यांसह वाहनांच्या मूळ रचनेत बदल करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. रात्री ९.३० ते १२ पर्यंतही कारवाई सुरू होती. अचानक मोहीम राबवल्याने अनेकांना पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागला.
हेही वाचा :
- ग्रामपंचायत रणांगण निकाल : राधानगरी तालुक्यात सर्वसामान्यांना सरपंचपदी संधी
- पुणे : रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला
- पुणे : शासकीय रुग्णालयांत होणार परवडणार्या दरात दंत उपचार
The post नाशिक : 'नाइट रायडर्स' जरा जपूनच, पोलिसांनी जप्त केल्या २६ गाड्या appeared first on पुढारी.