Site icon

नाशिक : नातूच झाला आजीचा वैरी, दोन मित्रांच्या सहाय्याने केली लूट

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील मालसाने येथील वयोवृद्ध सखुबाई शिंदे यांच्यावर अंधारात हल्ला करीत ५२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या जखमी आजीच्या भामट्या नातूसह त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे व त्यांच्या पथकास यश आले आहे. या घटनेतून नातूच आजीचा वैरी झाल्याची चर्चा मालसाने शिवारात आहे.

मालसाने शिवारातील शेत गट नंबर १४४ मधील विहिरीवरील बल्ब चालू-बंद होत असल्याने रात्रीच्या वेळी सखुबाई चंदर शिंदे (७७) या पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला करीत तिच्या अंगावरील ५२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढला होता. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसांत दि. २ मे रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वडनेरभैरवचे नवनियुक्त पोलिस अधिकारी मयूर भामरे यांना गोपनीय माहितीच्या आधारे फिर्यादीचा नातू सतीश उर्फ गणेश बारकू शिंदे (२३) यानेच हल्ला करीत जबरी चोरी केल्याचे समजले होते. भामरे यांनी नाशिक तालुक्यातील शिंदे–पळसे येथे सापळा रचत सतीश उर्फ गणेश शिंदे याला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित हा फिर्यादीच्या पुतण्याचा मुलगा असून, त्याला आजी घरी एकटी राहात असल्याचे माहीत होते. त्यामुळे त्याने कळवण तालुक्यातील करमाळे येथील विशाल गुलाब पवार (२४) व जलराम उर्फ जाल्या किसन पवार (२७, रा. शेषराव महाराज मंदिराजवळ, एकलहरे वस्ती, कळवण) या दोन्ही मित्रांना बोलवून घेत गुन्हा केल्याची कबुली दिली. संशयितांना चांदवड न्यायालयात नेले असता, न्यायाधीश माने यांनी सोमवार (दि. 29) पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

ही कारवाई वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलिस उपनिरीक्षक परशराम तागड, दीपक दोडे, रमेश आवारे, पोलिस नाईक पांडुरंग वाघमारे, पोलिस नाईक घुमरे, पोलिस नाईक शांताराम माळी, पोलिस शिपाई मारेश्वर पिठे, पोलिस शिपाई प्रवीण भुसाळ, पोलिस शिपाई झाल्टे, पोलिस हवालदार आर. एम. कोरडे, पोलिस शिपाई ए. बी. चारोस्कर यांनी कारवाई केली.

हेही वाचा :

The post नाशिक : नातूच झाला आजीचा वैरी, दोन मित्रांच्या सहाय्याने केली लूट appeared first on पुढारी.

Exit mobile version