
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उत्तर महाराष्ट्रातील नामांकित नामको हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या प्रकाश रसिकलाल धारिवाल कार्डिअॅक सेंटरचे उद्घाटन शनिवारी (दि.18) सकाळी 10 वाजता केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल हृदयरुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, रुग्णसेवेच्या वाटेवरील ही सुविधा एक मैलाचा दगड ठरणार असल्याची माहिती नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सचिव शशिकांत पारख यांनी दिली.
पेठ रोडवरील नामको हॉस्पिटलच्या मध्यवर्ती सभागृहात उद्घाटन सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कार्डिअॅक केअर सेंटरचे दाते प्रकाश धारिवाल यांच्या अध्यक्षतेत या सोहळ्याला सुरुवात होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नामको बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार वसंत गिते, खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अॅड. राहुल ढिकले, महेंद्र ओस्तवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याला अधिकाधिक नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही ट्रस्टचे अध्यक्ष भंडारी, सचिव पारख, खजिनदार अशोक साखला यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे उपाध्यक्ष आनंद बागमार, सहसचिव राहुल जैन-देढिया, विश्वस्त कांतीलाल पवार, बेबीलाल संचेती, सुरेश पाटील, जयप्रकाश जातेगावकर, रवींद्र गोठी, ललित मोदी, अरुणकुमार मुनोत, गौतम हिरण, प्रतिष छाजेड, नंदलाल पारख, संपतलाल पुंगलिया, चंद्रकांत पारख, महेश लोढा आदी उपस्थित होते.
कॅथलॅब ठरणार वरदान
कार्डिअॅक कॅथलॅबच्या माध्यमातून रुग्णांवर सर्वोत्तम दर्जाचे अँजिओप्लास्टी व इतर इंटरव्हेंशनल उपचार विविध शासकीय योजनांद्वारे विनामूल्य केले जातील. कॅन्सर व हृदयरोगाचे प्रमाण जवळपास सारखेच घातक सिद्ध होत आहे. हृदयरोगाचे उपचारदेखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे गेले आहेत. या परिस्थितीत नामको कार्डिअॅक केअर सेंटर सर्वसामान्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी व्यक्त केला.
हेही वाचा:
- नगर : गावठी कट्टा बाळगणार्या दोघांना बेड्या; वेशांतर करून घेतले ताब्यात
- पेठ आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवा कोलमडली
- Ram Charan : रेड कार्पेटवर आम्ही गेलो, ऑस्कर मिळवला याचा अभिमान
The post नाशिक : ‘नामको’च्या धारिवाल कार्डिअॅक सेंटरचे ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्या लोकार्पण appeared first on पुढारी.