
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदावरी, वालदेवी या नद्यांना जाऊन मिळणाऱ्या नैसर्गिक नाल्यांमधील सांडपाण्यावर नाल्यांच्या उगमस्थानीच आता प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी आयआयटी पवईने शहरातील नाल्यांचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले असून, प्रायोगिक तत्वावर सुरूवातीला पाच नाल्यांची निवड करण्यात आली आहे. एप्रिलपासून नाल्यांमधील सांडपाण्यावर एन ट्रीट नावाच्या यंत्रणेव्दारे प्रक्रिया केली जाणार असल्याने पावसाळ्यापूर्वीच नद्यांमध्ये प्रक्रियायुक्त पाणी सोडले जाईल.
नाशिक शहरात जवळपास ३५ ते ४० नैसर्गिक नाले आहेत. यातील बहुतांश नाल्यांमधून मलजलयुक्त सांडपाणी वाहत असते आणि पुढे हेच पाणी गाेदावरी, वालदेवी या नद्यांमध्ये जाऊन मिसळते. यामुळे नद्यांचे पात्र प्रदुषित होत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी, या उद्देशाने मनपा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. आजमितीस गोदावरी, वालदेवी या नद्यांमध्ये अनेक प्रकारचे प्रदुषण आढळून येते तर वाघाडी आणि नासर्डी या उपनद्यांमध्ये तर घरा घरातील सांडपाण्याबरोबरच रसायनमिश्रीत पाणी नैसर्गिक नाल्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मिसळत असल्याने उपनद्यांना तर प्रदुषणाचाच विळखा बसलेला आहे. प्रदुषणाचा हा विळखा कमी होण्याच्या दृष्टीने मनपाने पावले उचलली असून, आयआयटी पवई त्यासाठी मनपाला सहकार्य करणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून, पावसाळ्यापूर्वी शहरातील पाच नाल्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी एनसीटू ही यंत्रणा आंमलात आणली जाणार आहे. नाल्याच्या उगमस्थानीच ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याने नाल्यातील सर्वच सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन पुढे तेच प्रक्रियायुक्त पाणी नद्यांमध्ये मिसळले जाईल. पर्यायाने नद्यांचे प्रदूषण कमी होण्यास हातभार लागणार आहे.
या पाच नाल्यांची निवड
नाशिक शहरातील नाशिकरोड विभागातील डोबी नाला (विहितगाव जवळील), चेहेडी नाला तसेच गंगापूर गावाजवळील चिखली नाला, फेम सिनेमालगत असलेला नाला व वाघाडी नदी या नाल्यांची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात आली आहे. या नाल्यांच्या ठिकाणी जागेवरच सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याने प्रक्रियायुक्त पाणी नद्यांमध्ये जाऊन मिसळणार आहे. त्यामुळे नद्यांमध्ये प्रदुषण व दुर्गंधीयुक्त मिसळणाऱ्या पाण्याला ब्रेक लागणार आहे.
साधारण एप्रिल महिन्यापासून या कामला सुरूवात होईल आणि पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सविस्तर अहवाल तयार झाल्यानंतर यंत्रणा निर्माण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल आणि त्यानंतरच कामाला सुरूवात होईल.
– नितीन वंजारी, शहर अभियंता- मनपा, नाशिक
हेही वाचा :
- Xi Jinping | शी जिनपिंग यांचे चीनवर वर्चस्व कायम, तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड
- Goa Forest Fire : पश्चिम घाट जळतोय, जंगलातील अग्नितांडवामुळे दुर्मिळ जैवविवधता नष्ट!
- नाशिकमध्ये सत्ताकाळात भ्रष्टाचाराचा एकही कलंक नाही : राज ठाकरे
The post नाशिक : नाल्यांमधील सांडपाण्यावर आता उगमस्थानीच प्रक्रिया appeared first on पुढारी.