नाशिक : नाशिककरांना ‘ई-शिवाई’ची प्रतीक्षा कायम

ई शिवाई www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सुमारे तीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या फेम-2 योजनेंतर्गत राज्यातील आंतर-शहर वाहतुकीसाठी विद्युत बस अर्थात ‘ई-शिवाई’ बस सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घेतला होता. दोन वर्षे कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाखाली गेल्यानंतर 1 जूनपासून पुणे-अहमदनगर या मार्गावर पहिली शिवाई धावत आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर मार्गावरही शिवाई सुरू करण्यात आल्या. मात्र, अद्यापही नाशिककरांना ‘ई-शिवाई’ची प्रतीक्षा कायम आहे.

एसटी महामंडळाकडून पर्यावरणपूरक आणि आरामदायी असलेली ‘ई-शिवाई’ बस खासगीकरणाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरविण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील चार्जिंग स्टेशनसाठीच्या जागांची चाचपणी एसटी व महावितरणच्या अधिकार्‍यांकडून करण्यात आली होती. चाचपणीनंतर नाशिकसाठी आगार क्रमांक एकच्या प्रवेशद्वाराजवळील सुरक्षारक्षक कक्षाच्या मागील जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. एकाच वेळी 10 शिवाई चार्चिंगसाठी उभ्या राहू शकतात, असे स्टेशन उभारण्यासाठी महावितरण उपकेंद्राची निर्मिती करणार होते. मात्र, महावितरणकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने चार्जिंग स्टेशनचे काम रेंगाळले आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच सुमारे 150 ‘ई-शिवाई’ बसेस दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील 50 बसेससाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, प्रसन्न पर्पल ट्रॅव्हल्स कंपनीकडून या बसेस एसटी महामंडळाला पुरविण्यात आल्या आहेत. दरम्यान, नाशिक विभागाने 13 ‘ई-शिवाई’ मागण्यांचा प्रस्ताव एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने नाशिकला किती शिवाई मिळणार? हे गुलदस्त्यातच आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : नाशिककरांना ‘ई-शिवाई’ची प्रतीक्षा कायम appeared first on पुढारी.