नाशिक : ‘नासा’ मान्सून स्कूटर रॅलीचा शनिवारी थरार

मान्सून रॅली,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नासिक ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशन अर्थात नासातर्फे येत्या शनिवारी (दि.17) ‘टीव्हीएस एंटॉर्क ‘नासा मान्सून स्कूटर रॅली ऑफ नासिक 2022’ या पावसाळी स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नासाचे दिवंगत अध्यक्ष कै. भास्कर पटवर्धन यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणारी ही स्पर्धा फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एफएमएससीआय) या भारत सरकारच्या मान्यताप्राप्त शिखर संस्थेच्या निकषानुसार सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात खेळवण्यात येणार आहे.

‘नासा’ने ही स्पर्धा जाहीर करताच देशभरातील स्पर्धकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत यजमान नाशिकसह मुंबई, पुणे, नागपूर, भोपाळ, बंगळुरू आदी शहरांतून तब्बल 28 स्पर्धकांनी सहभाग निश्चित केला असून, अजून 10 ते 15 प्रवेशिका मिळतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. ही स्पर्धा सहा गटांमध्ये विभागून घेण्यात येणार असून, महिलांसह इलेक्ट्रिक स्कूटर्सचाही एक गट असणार आहे. विल्होळी येथील केव्हज काउंटी रिसॉर्ट येथे शुक्रवारी (दि.16) सकाळी स्पर्धेत सहभागी असणार्‍या वाहनांची तपासणी झाल्यावर समारंभपूर्वक सुरुवात करून स्पर्धकांना स्पर्धेचा मार्ग दाखविण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या देखरेख अधिकारी म्हणून प्रशांत गडकरी, मनीष चिटको, सलील दातार यांची, तर वाहन तपासणीस म्हणून रवींद्र वाघचौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी (दि.17) सकाळी 9 वाजता केव्हज काउंटी येथून स्पर्धेला सुरुवात होईल. एकूण 30 किलोमीटर अंतरात 18 किलोमीटर अंतर हे स्पर्धात्मक असेल. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धाप्रमुख सूरज कुटे यांच्यासह शमीम खान व अंकित गज्जर प्रयत्नशील आहेत.

छायाचित्र स्पर्धेची संधी
या स्पर्धेच्या निमित्ताने छायाचित्रकारांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे. दैनिकात छापून आलेल्या छायाचित्रासाठीच ही स्पर्धा असणार आहे. फोटोमध्ये प्रायोजक, स्पर्धेतील थरार, तसेच पारितोषिक वितरण समारंभ यांचा समावेश असणे आवश्यक आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी छापून आलेले फोटोचे वृत्तपत्रातील कात्रण व 8बाय 10 आकारातील फोटो
20 सप्टेंबरला संध्याकाळी 5 पर्यंत जमा करावी लागणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ‘नासा’ मान्सून स्कूटर रॅलीचा शनिवारी थरार appeared first on पुढारी.