नाशिक : निफाड तालुक्यात यंदा प्रथमच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसच्याही पुढे

निफाड तालुका www.pudhari.news

नाशिक : दीपक श्रीवास्तव

कृषी पंढरीतून…

वर्षाच्या प्रारंभीच राज्यात थंडीच्या नीचांकी तापमानाची विक्रमी नोंद करणारा आणि महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा निफाड तालुका सध्या उष्णतेच्या लाटेमुळे होरपळून निघत आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच येथील तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील तापमान 40 अंशांच्या पुढे जात असताना तीन दिवसांपूर्वीच लासलगाव येथे तापमापकातील पार्‍याने 42 अंश सेल्सियसची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. उन्हाच्या काहिलीमुळे दुपारच्या वेळी खेड्यापाड्यांमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. निफाड तालुक्यातील गोदावरी नदीलगतच्या परिसरामध्ये त्यामानाने शीतलता असली, तरी उर्वरित तालुक्यांमध्ये विशेष करून येवला, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांना लागून असलेल्या गावांमध्ये उन्हाळा जास्तच तीव्रतेने जाणवत आहे. अजूनपर्यंत निफाड तालुक्यात उष्माघाताचे रुग्ण आढळलेले नाहीत. परंतु तरीदेखील कोणताही जीवितहानीसारखा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शासनाच्या, आरोग्य खात्याच्या वतीने निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांवर उपचारासाठी विशेष लक्ष देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभळे यांच्या नेतृत्वाखाली या कामी विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. उष्माघाताची लक्षणे आणि उष्माघातापासून बचाव करण्याचे मार्ग याविषयी आरोग्य खात्याच्या वतीने लोकप्रबोधनदेखील करण्यात येत असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे.

गेल्या वर्षी दिवाळीपर्यंत चाललेला पाऊस आणि त्यामुळे भरलेली धरणे ही जमेची बाजू असल्याने तसेच सध्या थोडक्या प्रमाणातील उसाचे क्षेत्र, द्राक्षबागा सोडल्या, तर इतर पिके नसल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची मागणी कमी झालेली म्हणता येईल. निफाड तालुक्यातील थेटाळे, कानळद, पिंपळगाव निपाणी व अन्य काही गावांना अवर्षण परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या भेडसावत असते. परंतु यंदा अजूनपर्यंत तसा काही प्रश्न उद्भवलेला दिसून येत नाही. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील कानळदसारख्या काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या काही वेगळीच आहे. या परिसरामध्ये गोदावरी नदी व खार जमिनीमुळे जमिनीतील मिळणारे पाणी हे अतिशय खारवट दूषित झालेले असून पिण्यायोग्य उरलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना अन्यत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे भाग पडत असते.

शासन यंत्रणा सतर्क
निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे आणि गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई नसून अजूनपर्यंत एकाही गावातून पाणीटंचाईची समस्या उद्भवलेली असल्याचा अहवाल मिळालेला नाही. मात्र, तशी गरज भासल्यास शासन यंत्रणा आपल्या परीने तोंड देण्यास सज्ज आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे.

The post नाशिक : निफाड तालुक्यात यंदा प्रथमच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसच्याही पुढे appeared first on पुढारी.