नाशिक: निवृत्तिनाथ संस्थानाच्या कर्मचार्‍यांना स्वतंत्र ड्रेस कोड

Nivruti Sanstha www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी संस्थानाच्या नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाच्या पहिल्या आढावा बैठकीत संस्थानाच्या कर्मचार्‍यांना स्वतंत्र ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर प्रशासनाबाबत संलग्न असणार्‍या प्रलंबित कामांबाबत चर्चा करण्यात आली. गजानन महाराज संस्थानच्या धर्तीवर नवे उपक्रम राबवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

संस्थानच्या कार्यालयात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थानाचे अध्यक्ष नीलेश महाराज गाढवे, सचिव सोमनाथ घोटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. 30) बैठक झाली. बैठकीला विश्वस्त श्री नारायण मुठाळ, माधव महाराज राठी, श्रीपाद कुलकर्णी, जयंत महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, भानुदास महाराज गोसावी, नवनाथ महाराज गांगुर्डे, राहुल महाराज साळुंके, अमर ठोंबरे, व्यवस्थापक गंगाराम झोले उपस्थित होते. बैठकीत केंद्र सरकारच्या वतीने सुरू असलेल्या प्रसाद योजनेच्या मंदिर बांधकामाचा आढावा घेण्यात आला. तसेच भक्तनिवास भाविकांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. पौषवारीसाठी येणार्‍या वारकर्‍यांना कोणत्याही असुविधा होणार नाहीत याबाबत नियोजन करण्यात आले. तसेच संस्थानच्या कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र ड्रेस कोडवर संस्थानाचे नाव असणार आहे. त्यांचबरोबर संस्थानच्या विश्वस्त मंडळासाठी ओळखपत्र बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधिस्थानाची व्याप्ती जगभर वाढण्यासाठी संस्थान अधिक डिजिटल करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर संत निवृत्तिनाथ महाराज संस्थान यांच्या नावे एक फेसबुक पेज व ब्लॉग बनविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजरातीतून नाथांची व त्यांच्या संजीवन समाधीबाबतची माहिती या ठिकाणी मिळणार आहे. बैठकीत संत निवृत्तिनाथ संस्थानाचे अधिकृत प्रसिद्धिप्रमुख तथा माध्यम प्रतिनिधी म्हणून विश्वस्त अमर ठोंबरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

हेही वाचा:

The post नाशिक: निवृत्तिनाथ संस्थानाच्या कर्मचार्‍यांना स्वतंत्र ड्रेस कोड appeared first on पुढारी.