Site icon

नाशिक : निवृत्त मनपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी सेनेच्या शिष्टमंडळाने म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची भेट घेतली. सातव्या वेतन आयोगाचा फरक तसेच देय असलेले अन्य लाभ महापालिका प्रशासनाकडून त्वरित मिळावेत, यासाठी आपण पावले उचलावीत, अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

दिवाळीपूर्वी याबाबत तोडगा न निघाल्यास म्युनिसिपल कर्मचारी सेनेतर्फे राजीव गांधी भवनासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. नाशिक माहापालिकेत कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचार्‍यांना शासन निर्णयानुसार सातवा वेतन आयोग 1 एप्रिल 2021 पासून लागू केला आहे. मात्र 1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना 1 जानेवारी 2016 ते 31 मार्च 2021 या कालावधीचा फरक तसेच याच कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कर्तव्य कालावधीतील सातवा वेतन आयोगाचा फरक तसेच 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना देय असलेले सेवा उपदान, अर्जित रजेचे सममूल्य व अंश राशीकरण फरकाची रक्कम शासन निर्णयानुसार एकरकमी अदा करण्याचे आदेश आहेत. या रकमा मिळाव्यात, यासाठी संघटनेमार्फत गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र महापालिका प्रशासन संबंधित रक्कम अदा करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. दिवाळीपूर्वी देय रक्कम मनपा प्रशासनाने अदा न केल्यास सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी आंदोलनास बसतील, असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. यावेळी उपाध्यक्ष जगदीश पाटोळे, जनरल सेक्रेटरी श्रीहरी पवार, खजिनदार भास्कर काठे, कार्यकारिणी सदस्य लता पाटील, बाळासाहेब बंदावणे, रत्नाकर शिंदे, मधुकर पवार, रमेश गाजरे, गोरखनाथ आव्हाळे, आबासाहेब हिरे, रमेश पवार, प्रतिभा खर्डे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : निवृत्त मनपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version