नाशिक : निसर्गाला वाचविण्यासाठी ‘त्या’ दोघी जोपासताय आगळावेगळा छंद

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

गेल्या तीन वर्षांपासून प्रा. मंगल सांगळे यांनी प्रियांका बाळासाहेब केदार हिच्या मदतीने सुरू केलेल्या तरुप्रीत प्रकल्पांंतर्गत सिन्नरच्या ओसाड माळरानावर बीजारोपण व वृक्षारोपण करण्याचा एक उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी आजवर 13 हजारांपेक्षा अधिक बीजारोपण केले असल्याने पर्यावरण संवर्धनाचा हा उपक्रम तालुक्यात प्रेरणादायी ठरत आहे.

आजपर्यंत ढग्या डोंगर परिसर, जामगाव-पास्ते परिसर, लोणारवाडी, विश्रामगड परिसर अशा अनेक ठिकाणी जवळपास 11 हजारांपेक्षा जास्त बीजारोपण केले असून, वेळोवेळी वृक्षारोपण व त्याचे संवर्धनही केले आहे. यात प्रामुख्याने सीताफळ, कडुलिंब, गुलमोहर, निलमोहोर, कांचन, करंजी, आंबा यांसारख्या वृक्षांचे बीजारोपण केले.

सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील प्रा. सांगळे, प्रियंका केदार यांनी सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसर, म्हाळोबा मंदिर व परिसर तसेच ढग्या डोंगर परिसरात जवळपास दोन हजार बियांचे रोपण केले आहे. म्हणजे आजवर 13 हजारांपेक्षा अधिक बीजारोपण केल्याचे एक समाधान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी कमी पाण्यावर येऊ शकणार्‍या व जनावरांपासून सुरक्षित राहू शकणार्‍या सीताफळ, कडुलिंब, गुलमोहर, निलमोहोर, कांचन, करंजी यांसारख्या वृक्षांचे बीजारोपण करण्यात आले आहे. प्रसंगी यावर्षी श्रीकांत केकाणे यानेही बीजारोपणात सहभाग नोंदविला.

तालुक्यातील ओसाड माळरानावर हिरवागार निसर्ग फुलवण्यासाठी आम्ही आणखी उपक्रम राबवणार आहोत. स्वखर्चातून काम करण्याचा मानस असल्यामुळे कुणी स्वेच्छेने बिया व रोपे दिली तरच ती आम्ही स्वीकारतो. अन्यथा आमच्याकडून पर्यावरण संवर्धनासाठी जो काही खारीचा वाटा उचलला जाऊ शकतो, ते करण्याचा आम्ही दरवर्षी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि यापुढेही आमचे हे काम असेच सुरू राहील
-प्रा. मंगल सांगळे

 

तरुप्रीत प्रकल्पांंतर्गत सिन्नरच्या ओसाड माळरानावर बीजारोपण व वृक्षारोपण करण्याचा एक उपक्रम सुरू केला आहे. निसर्ग इतके भरभरून देतो मग आपणही त्याच्यासाठी काहीतरी करण्याची हीच तर खरी वेळ आहे, असे आम्हाला मनापासून वाटते.
-प्रियंका केदार

हेही वाचा :

The post नाशिक : निसर्गाला वाचविण्यासाठी 'त्या' दोघी जोपासताय आगळावेगळा छंद appeared first on पुढारी.