नाशिक : निसाका सुरू होण्याचा मार्ग झाला मोकळा

निसाका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) ज्या धर्तीवर जिल्हा बँकेने चालविण्यास दिला, त्याच धर्तीवर निफाड सहकारी साखर कारखाना (निसाका) चालविण्यासाठी जिल्हा बँकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीची निविदा अव्वल ठरल्याने मंजूर करण्यात आली. गेल्या 10 वर्षांपासून बंद पडलेला कारखाना आता सुरू होणार असल्याने निफाड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

निसाकाने जिल्हा बँकेकडून 15 वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्याने 10 वर्षांपूर्वी बँकेने कारखान्याचा ताबा घेतला होता. त्यामुळे गेल्या 10 वर्षांपासून कारखाना बंद होता. कारखाना सुरू होण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध राजकीय पदाधिकार्‍यांकडून प्रयत्न सुरू होते. कारखाना सुरू होण्यासाठी शेतकर्‍यांकडून यापूर्वी अनेकदा आंदोलनेही झालेली आहेत. परंतु, बँकेचे कर्ज असल्याने कारखाना सुरू होण्यात अनेक अडथळे होते. पदाधिकारी व शेतकर्‍यांच्या तगाद्यामुळे जिल्हा बँकेने निसाका भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता. बँक प्रशासनाने या विषयीची जाहिरात देत निविदा प्रक्रिया सुरू केली होती. पाच मक्तेदारांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. बँकेने सोमवारी (दि. 10) सायंकाळी निविदा उघडल्या. या प्रक्रियेमध्ये चार मक्तेदार मागे पडले असून, नाशिकची बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीची निविदा अव्वल ठरली. त्यांची निविदा मंजूर झाल्याने आता पुढील 25 वर्षे निफाड सहकारी साखर कारखान्याची सूत्रे कडलग कन्स्ट्रक्शन कंपनीकडे जाणार आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : निसाका सुरू होण्याचा मार्ग झाला मोकळा appeared first on पुढारी.