नाशिक : नेत्यांचे पक्षांतर; कॅलेंडर वाटपास अडसर

कॅलेंडर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटात बरीच उलथापालथ होत असल्याने इच्छुकांची चांगलीच पंचाईत होताना दिसत आहे. स्थानिक नेते दररोज या गटातून त्या गटात कोलांटउड्या मारू लागल्याने, कोणासोबत जावे? अशा द्विधा मनःस्थितीत इच्छुक सापडले आहेत. त्याचा परिणाम कॅलेंडर वाटपावर होत असून, बहुतांश शिवसेनेच्या माजी नगरसेवक तसेच इच्छुकांचे कॅलेंडर अद्याप मतदारांपर्यंत पोहोचलेच नसल्याची स्थिती आहे.

कॅलेंडर छापताना त्यावर आपल्या स्थानिक नेत्यांचे फोटो छापले जातात. मात्र, ठाकरे गटातील एक-एक नेता शिंदे गटात उडी घेत असल्याने फोटो नेमका कोणाचा छापायचा, असा प्रश्न इच्छुकांना पडत आहे. दुसरीकडे शिंदे गटात दररोज नवीन नेता दाखल होऊ लागल्याने, प्रोटोकॉलमध्ये त्यांचाही फोटो असावा म्हणून इच्छुक ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. अशात जानेवारी महिना निम्मा संपत येत असतानासुद्धा इच्छुकांचे कॅलेंडर मतदारांपर्यंत पोहोचलेच नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.10) सातपूरमधील ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकाने घरोघरी कॅलेंडर वाटपास सुरुवात केली. त्यामुळे काही मतदारांनी यंदा उशिरा कॅलेंडर का पाठविले? अशी कार्यकर्त्यांना विचारणा केली. त्यावर सध्या नेत्यांच्या कोलांटउड्या सुरू असल्याने, नेमका कोणाचा फोटो प्रोटोकॉलमध्ये छापायचा, असा संभ्रम असल्यानेच कॅलेंडरचे यंदा उशिराने वाटप सुरू केल्याचे त्या कार्यकर्त्याने सांगितले. दरम्यान, यंदा महापालिकेच्या निवडणुका केव्हाही घोषित केल्या जाण्याची शक्यता आहे. अशात इच्छुक सरसावले असून, अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. इतर पक्षांतील इच्छुकांकडूनदेखील प्रचारावर भर दिला जात आहे.

तिळगूळ वाटपातून प्रचार
महापालिका निवडणुकांची केव्हाही घोषणा केली जाण्याची शक्यता असल्याने, नूतन वर्षाच्या प्रारंभीच येणार्‍या मकरसंक्रांतीनिमित्त इच्छुकांकडून प्रचाराचा धुरळा उडवून दिला जाण्याची शक्यता आहे. घरोघरी प्रचार करण्यासाठी तिळगुळाचे वाटप उत्तम माध्यम ठरत असल्याने, इच्छुक तिळगुळाचे पॅकेट घरोघरी पोहोचविण्याची तयारी करीत आहेत. मात्र, ठाकरे गटाला या ठिकाणीदेखील अडचणी येताना दिसत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : नेत्यांचे पक्षांतर; कॅलेंडर वाटपास अडसर appeared first on पुढारी.