
नाशिकरोड : उमेश देशमुख
भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयाच्या नेहरूनगर वसाहतीच्या इमारतीला मोठे तडे गेले आहेत. संरक्षक भिंतीलादेखील मोठे भगदाड पडले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या कामगार वसाहतीची वाट लागली आहे. एकेकाळी सर्व जाती-धर्मातील नागरिकांच्या वास्तव्याने गजबजणार्या वसाहतीची प्रचंड पडझड झालेली आहे.
नेहरूनगर वसाहतीत सुमारे 2005 पर्यंत कामगारांचे वास्तव्य होते. कालांतराने कामगारांची रोडावलेली संख्या आणि स्वमालकीच्या घराला दिलेले प्राधान्य, यामुळे दिवसेंदिवस वसाहत रिकामी होत गेली. सद्यस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा दल कर्मचार्यांचा अपवाद वगळता, वसाहतीला माळरानाचे स्वरूप आल्याचे दिसते.
सायकल स्टॅण्डचे दरवाजे, कडीकोयंडा चोरीला गेले आहेत. प्लास्टिक, लोखंडी पाइप, खिडक्यांची तावदानेदेखील भुरट्या चोरांनी लांबविली आहेत. कामगारवर्गाचे वास्तव्य नसल्याने इमारतींवर जंगली वेली, वनस्पतींचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. नेहरूनगर वसाहतीच्या संरक्षक भिंतीला भगदाड पडल्याचे दिसते. अशा प्रकाराने येथील सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ही वसाहत ही सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील समजली जाते.
उपनगर व शिखरेवाडी येथे प्रत्येकी एक, तर नाशिक-पुणे रोड तसेच नवीन नेहरूनगर येथे प्रत्येकी दोन अशा एकूण सहा ठिकाणी प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी एकाही ठिकाणी तपासणी केली जात नाही. तसेच चोख बंदोबस्तदेखील नाही. एकंदरीत येथील नेहरूनगर वसाहतीची सुरक्षाच ‘रामभरोसे’ आहे. याशिवाय उपनगर पोलिस ठाणे, महापालिका व केंद्रीय विद्यालयाची शाळादेखील या वसाहतीत आहे. अंतर्गत व बाह्य सुरक्षेचा बडेजाव मिरवणार्या भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय प्रशासनाला वसाहतीकडे लक्ष पुरविण्याकरिता पुरेसा वेळ नाही. याविषयी कामगार वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जुने नेहरूनगर व नवीन नेहरूनगर अशा दोन्हीही ठिकाणी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात होती. फटाक्यांच्या आतषबाजीने लहान-मोठ्यांमध्ये उत्साह संचारत होता. आकाशकंदील, विद्युत रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजीने नेहरूनगर उजळून निघत होते. दिवसभरातील 12 तासांच्या कामाने आलेला थकवा कामगार या उत्साहात विसरून जात होते. चेहर्यावरील ताण-तणाव बाजूला सारून कामगारही दिवाळीत मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसत. विविध कलागुणांनी परिपूर्ण कामगार येथील वेल्फेअर हॉलमध्ये कलाविष्कार सादर करीत होते. नाटक, गायन, भजने आदी कलांमधून कामगारांचे कलागुण पाहावयास मिळत होते. एकवेळ विद्युत आकाशकंदील, विद्युत रोषणाई व कामगार कुटुंबीयांच्या वास्तव्याने उजळून निघणार्या वसाहतीत आज उलटे चित्र आहे. सर्वच कामगारांनी स्वमालकीच्या घरात राहण्यास पसंती दिली आहे. शिवाय दिवसेंदिवस कामगारांची संख्या घटत आहे. अशा एक ना अनेक कारणांमुळे आज नेहरूनगर वसाहत ओसाड पडली आहे. कामगारांची जागा आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यांचे प्रमाणही अत्यल्प आहे. घरासमोरील आकाशकंदील, विद्युत रोषणाई व झगमगाट आज नाहीसा झाला आहे. एकूणच नेहरूनगर वसाहतीमध्ये साजर्या होणार्या दिवाळीची रौनकच हरवली आहे.
सर्व जातीधर्माच्या लोकांचे वास्तव्य
साधारण 1985 च्या आसपास नेहरूनगर वसाहत उभी राहिली. त्यावेळी कामगार संख्यादेखील 20 हजारांवर होती. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या वसाहतीला मागणी वाढली होती. अल्पावधीतच वसाहत कामगार कुटुंबीयांनी गजबजू लागली. शाळा, दवाखाना, बाजारपेठ, क्रीडांगण व करमणुकीसाठी वेल्फेअर हॉल आदी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या वसाहतीत अल्पावधीतच सर्वच धर्मांतील लोक एकत्र गुण्या-गोविंदाने नांदताना दिसत होते. एकमेकांचे दु:ख-अडचणींत सहभागी होत असत. सार्वजनिक सण-उत्सवात अग्रेसर, तर एकमेकांच्या कौटुंबिक सुख-दु:खात सहभागी होत राष्ट्रीय नेत्यांचा जयंती, उत्सव, सण या सार्वजनिक उपक्रमात सर्वजण एकत्र येत. दिवाळी सण साजरा करण्याची येथील मजाच काही वेगळी होती.
प्रेस कामगारांच्या वास्तव्यासाठी नेहरूनगर वसाहतीचे बांधकाम झाले. साधारण 1985 ते 1990 च्या दरम्यान वन रूम किचन, हॉल, बेडरूम, टॉयलेट, बाथरूम, गॅलरी, सायकल शेड अशा विविध सुविधांनी परिपूर्ण असलेले स्टाफरूम प्रेसकामगारांसाठी उपलब्ध होते, हे खूपच विशेष होते. – जगदीश गोडसे, जनरल सेक्रेटरी, मजदूर संघ.
हेही वाचा :
- नाशिक : ‘मेरी’च्या ’अब तक 56’ इमारती धूळ खात
- नाशिक : गांधीनगर मुद्रणालय वसाहत नामशेष होण्याच्या मार्गावर
The post नाशिक : नेहरूनगर वसाहतीची दुर्दशा, साहित्याची चोरी appeared first on पुढारी.