नाशिक : नैसर्गिक नाल्यांची माहिती आयुक्तांनी पुन्हा मागवली

नैसर्गिक नाले ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दोन वर्षांपूर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकदा विविध ठिकाणी पावसाचे पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावर तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी शहरातील सर्वच नैसर्गिक नाल्यांचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांसह नगररचना विभागाला दिले होते. परंतु, त्याबाबत पुढे काहीच झाले नाही. आता मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आढावा घेत नाल्यांबाबत माहिती घेत शहरातील नैसर्गिक नाल्यांची संख्या तसेच नाल्यांची ठिकाणे याबाबतची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.

शहरातील नैसर्गिक नाल्यांसंदर्भात महापालिकेत आजवर अनेकदा मुद्दे उपस्थित करण्यात आले. परंतु, त्याचे सविस्तर आणि तांत्रिकदृष्ट्या कधीच सर्वेक्षण झाले नाही की माहितीही मनपाच्या दप्तरी नाही. पाण्याचा निचरा करणाऱ्या नैसर्गिक नाल्यांवर आजमितीस अनेक ठिकाणी काही बिल्डरांनी बांधकामे केली आहेत. यामुळे अनेक नाले एकतर अर्धवट बुजविले गेले आहेत किंवा अरुंद झाले आहेत. यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा न होता शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. वडाळानाका परिसर, गोविंदनगर, पंचवटी तसेच सातपूर या भागांतील नैसर्गिक नाल्यांवर मोठमाेठी बांधकामे मनपातील नगररचना विभागाच्या आशीर्वादानेच यापूर्वी झालेली आहेत. त्यामुळेच नाल्यांचे सर्वेक्षण केले जात नाही की माहिती तयार होत नाही. आताही दीड-दोन वर्षांपूर्वी अशा प्रकारची माहिती तयार करण्याचे आदेश देऊन अद्यापही ही माहिती तयार झालेली नाही. त्याची बाब आयुक्त पुलकुंडवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत समोर आल्यानंतर त्यांनी अशा संबंधित नाल्यांची माहिती तयार करण्याचे पुनश्च एकदा आदेश दिले आहेत. यामुळे आता त्यांच्या आदेशानंतर तरी माहिती तयार होते की नाही याकडे लक्ष लागून आहे. आयुक्त कार्यालयाने संबंधित यादी सात दिवसांच्या आत सादर करण्याची सूचना केली आहे.

रमेश पवारांनीच दाखविले धाडस

पंचवटी विभागात नैसर्गिक नाल्यावर बांधकाम करण्याचा तसेच नाला बुजविण्याचा प्रकार समोर आला होता. त्या संदर्भात महापालिकेकडे तक्रार प्राप्त होताच तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी मनपा एमआरटीपी अर्थातच महाराष्ट्र प्रादेशिक नियाेजन व नगररचना अधिनियमचा वापर करून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. म्हसरूळ शिवारातील सर्व्हे क्रमांक ७१ मधील वरवंडी भागातील ही घटना होती. परंतु, त्यांच्यानंतर एकाही आयुक्ताने शहराच्या भविष्याच्या दृष्टीने नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही.

तक्रार येऊनही हातावर हात

वरुणा अर्थात वाघाडी नदीपात्रालगत अनेक ठिकाणी बांधकाम करण्यासाठी खोदकाम सुरू असल्याचे तसेच वाढीव बांधकाम करण्याकरता नदीपात्रात भराव टाकला जात असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी निशिकांत पगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनपाकडे केली आहे. असे असताना आयुक्त डॉ. पुलकुंडवार आणि इतरही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याबाबत ठोस अशी कार्यवाही केली नाही. त्यामुळे मनपाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : नैसर्गिक नाल्यांची माहिती आयुक्तांनी पुन्हा मागवली appeared first on पुढारी.