नाशिक : पंचवटीतील ३०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव आराेग्य मंत्रालयाकडे

hospital

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या पंचवटीतील ३०० खाटांच्या रुग्णालयाचा २३२ कोटींच्या खर्चाचा आराखडा अखेर महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या आराेग्य मंत्रालयाकडे सादर केला आहे. याकामी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर झाल्यामुळे मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक तरतूदही मंजूर होऊन रुग्णालयाचा प्रश्न निकाली निघू शकतो.

जिल्हा नियाेजन समितीत पालकमंत्री दादा भुसे यांनी पंचवटी आणि सिडकाे येथे दाेन रुग्णालये उभारण्याची घाेषणा केली होती. परंतु, त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली नव्हती. मात्र, आता पंचवटीतील रुग्णालयासाठी आमदार ढिकले यांनी पाठपुरावा करून प्रस्ताव शासन दरबारी पाठविला आहे. शहरात नाशिक महापालिकेची इंदिरा गांधी रुग्णालय, बिटको रुग्णालय, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय आणि जिजामाता रुग्णालय अशी चार मोठी रुग्णालये आहेत. त्यातील पंचवटी विभागातील इंदिरा गांधी रुग्णालयात जनरल ओपीडी, स्त्री मेडिकल व प्रसूती शस्त्रक्रिया, बालरुग्ण विभाग, लसीकरण केले जाते. या रुग्णालयात केवळ ५० खाटा आहेत. पंचवटी विभागाचा विस्तार पाहिल्यास या विभागात मोठे आणि सुसज्ज असे रुग्णालय नाही. त्यात सिंहस्थ कुंभमेळ्यात येथे लाखो भाविक, संत, महंत येत असल्याने जवळपास वर्षभर पंचवटी विभागात मोठी वर्दळ असते. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थेसाठी सुसज्ज रुग्णालयाची नितांत गरज असून, ही गरज ओळखून आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी रुग्णालयासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. इंदिरा गांधी रुग्णालयाची इमारत जुनी झाली आहे. त्यामुळे त्याठिकाणी आपत्कालीन उपचार करणे उचित ठरणार नाही.

आमदार ढिकले यांनी मालेगाव स्टॅण्ड येथील मनपा जागेवर रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव दिला. त्यानुसार मनपा आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी वैद्यकीय विभाग व नगररचना विभागाला जागा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. वैद्यकीय विभागाने जागेची पाहणी केली असून, रुग्णालयाचा आराखडाही बांधकाम विभागाकडे तयार आहे.

१४ हजार १९४ चाैमी जागा

दोन लाखांहून कमी लाेकसंख्या असल्यास अशा ठिकाणी कमीत कमी ५० व १५ अत्यावश्यक बेड असे एकूण ६५ बेडचे व किमान १०० बेडचे रुग्णालय तयार करता येते. २ ते ५ लाखांपर्यंत लाेकसंख्या असल्यास १०० व अत्यावश्यक २५ असे १२५ किंवा जास्तीत जास्त २०० खाटांचे रुग्णालय करता येते. ५ ते १० लाखांपर्यंत लाेकसंख्या असल्यास ३०० बेडचे रुग्णालय हाेऊ शकते. पंचवटी विभागातील लाेकसंख्या सुमारे आठ लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे या ठिकाणी किमान २०० ते ३०० खाटांचे रुग्णालय होऊ शकते. त्यासाठी मालेगाव स्टॅण्ड येथील अग्निशमन केंद्रालगतची १४ हजार १९४ चाैरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी २५ विशेष तज्ज्ञ, ३९ वैद्यकीय अधिकारी, २२४ स्टाफ नर्स, ६८ तांत्रिक, २४ प्रशासकीय, १० डेटा एण्ट्री ऑपरेटर, ६० वाॅर्डबाॅय, ४८ आया अशी पदभरती करावी लागणार असून, त्यासाठी वार्षिक ३५ काेटींचा निधी खर्च लागणार आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने पंचवटीतील प्रस्तावित ३०० खाटांचे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्या अनुषंगानेच केंद्र व राज्य शासनाकडे फास्ट ट्रॅकवर पाठपुरावा करत प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाकडे सादर केला आहे. विभागातील नागरिकांसह नाशिक शहरातील सामान्य, गोरगरीब नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न आहे.

– ॲड. राहुल ढिकले, आमदार, भाजप

हेही वाचा :

 

The post नाशिक : पंचवटीतील ३०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव आराेग्य मंत्रालयाकडे appeared first on पुढारी.