पंचवटी (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; मखमलाबाद रोडवरील जगझाप मळा परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून, पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका २८ वर्षीय युवकाची धारधार शास्त्रने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. काही मित्रांमध्ये दारूची पार्टी सुरू होती. यावेळी त्यांच्यात वाद झाले व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात मयताच्या पोटात आणि डोक्यात वार होऊन गंभीर जखमा झाल्याने हा युवक जागीच गतप्राण झाला. या हल्ल्यात अन्य एकजण जखमी झाला. तर घटनास्थळावरून पसार झालेल्या संशयित हल्लेखोरांना पंचवटी पोलिसांनी अवघ्या काही तासात कसबे सुकेणे येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Nashik Murder)
केदार साहेबराव इंगळे (वय २५ वर्ष, रा. कोशिरे मळा हनुमान वाडी, पंचवटी, नाशिक), ऋषिकेश रामचंद्र आहेर, (वय २३ वर्ष, रा. श्रीकृष्ण नगर, मोरे मळा, पंचवटी, नाशिक) , दीपक सुखदेव डगळे, (वय २३ वर्ष, रा मोरे मळा, रामनगर, पंचवटी, नाशिक) व नकुल सुरेश चव्हाण, (वय १८ वर्ष, रा. काकड बाग, मोरे मळा, पंचवटी, नाशिक) या चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सागर विष्णू शिंदे (वय २८, रा. मखमालाबाद नाका, क्रांतीनगर, पंचवटी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी (दि.१३) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास सागर व त्याचे मित्र मखमालाबाद रोडवरील जगझाप मळा परिसरातील प्रणव डिस्ट्रीब्युटर्स बाहेर ओट्यावर दारूची पार्टी करीत बसले होते. या सुमारास संशयित केदार इंगळे व त्याचे पाच ते सहा साथीदार लाल रंगाची चारचाकी व दुचाकीवरून याठिकाणी आले. त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून सागर व त्याचे मित्र यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यातच एकाने सागर शिंदे याच्यावर धारधार शास्त्राने वार केले. पोटात आणि डोक्यावर खोलवर गंभीर जखमा होऊन सागर रक्ताच्या थारोळ्यात पडला. तर अन्य एकजण जखमी झाला. यानंतर हल्लेखोर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय कार्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या काही तासात पळूूूून जात असलेले संशयित केदार इंगळे, ऋषीकेश आहेर, दीपक डगळे व नकुल चव्हाण या चौघा संशयित हल्लेखोरांना कसबे सुकेणे येथून शिताफीने ताब्यात घेतले. याप्रकरणी आकाश मोतीराम गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
यांनी बजाविली कामगिरी
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक परदेशी, पोलिस नाईक राकेश शिंदे, पोलिस अंमलदार नितीन पवार, गोरक्ष साबळे, घनश्याम महाले आदींनी बजाविली.
सर्वच एकमेकांचे मित्र होते
या घटनेतील सर्व एकमेकांचे मित्र होते. सागर शिंदेचे संशयित केदार इंगळे याच्या वडिलांसोबत दोन ते तीन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. यावेळी सागर याने संशयिताच्या वडिलांना शिवीगाळ केली होती. याचा मनात राग धरून संशयित केदार इंगळे व त्याच्या सहा ते सात साथीदारांनी मिळून सागर याची निर्घृण हत्या केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली तरी किरकोळ वादातून ही घटना घडली आहे. तर सागर शिंदे याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात तीन ते चार गुन्हे दाखल असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले.
The post नाशिक : पंचवटीत टोळक्याकडून युवकाची हत्या appeared first on पुढारी.