
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
पंचवटीतील सर्व मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पंचवटीकर हैराण झाले असून, यासंदर्भात दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध करताच मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्यास मुहूर्त सापडला आहे. या विभागाने युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली असून, डांबर व बारीक खडी टाकून खड्डे बुजविले जात आहेत.
गेल्या काही वर्षांत पंचवटीत कोट्यवधी रुपयांचे नवीन रस्ते व जुन्या रस्त्यांची दुरुस्ती झाली. परंतु, पहिल्याच पावसाने या रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. आधीचे खड्डे बुजत नाही तेच पुन्हा आलेल्या पावसाने अगोदर मलमपट्टी केलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डा नाही असा एकही रस्ता पंचवटीत सापडणार नाही. त्यातच आता पावसाने उघडीप दिल्याने धूळ आणि खड्ड्यांमुळे पंचवटीकर हैराण झाले आहेत. वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने दि. रोजी ‘जिकडे तिकडे चोहीकडे खड्डेच खड्डे’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. पंचवटीतील नवीन आडगाव नाका, सेवाकुंज, निमाणी बसस्थानक, दिंडोरीरोड, पेठरोड, हिरावाडी, अमृतधाम, औरंगाबाद रोड आदी भागांत तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजविण्याची माेहीम जोरात सुरू आहे.
…तर परिस्थिती ‘जैसे थे’
मनपाकडून केवळ डांबर व त्यावर बारीक खडी टाकून खड्डे बुजविले जात आहेत. काही ठिकाणी डांबराचे प्रमाण कमी आणि बारीक खडी जास्त टाकल्याने ही खडी रस्त्यावर पसरलेली आहे. या खडीवरून वाहने घसरण्याचीही शक्यता आहे. सध्या पावसाने उघडीप दिलेली असून, पुन्हा अचानक पावसाने जोर धरला तर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
‘देर आये पर, दुरुस्ती के लिये..
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर रस्त्यांमधील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वास्तविक पंधरा दिवस आधीच मनपाने खड्डे बुजवायला हवी होती, अशी प्रतिक्रिया गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, ‘देर आये पर, दुरुस्ती के लिये’ अशाही काही प्रतिक्रिया पंचवटीकरांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
हेही वाचा:
- पिंपरी : मोडकळीस आलेल्या इमारती पाडा, जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी
- मुंबई : आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच – उद्धव ठाकरे
- कारशेड हा इगोचा विषय नाही, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा
The post नाशिक : पंचवटीत रस्ते दुरस्तीला अखेर मुहूर्त appeared first on पुढारी.