Site icon

नाशिक : पं. बिरजू महाराजांना नृत्यमय आदरांजली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अभिजात नृत्य, नाट्य, संगीत अकादमीतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरात गुरुवारी (दि.17) ‘अनियारा’ या कथक नृत्य कार्यक्रमाद्वारे पं. रोहिणी भाटे आणि पं. बिरजू महाराज यांना नृत्यमय आदरांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात अष्टपदीने करण्यात आली. ज्यात अभिजात संस्थेच्या ज्येष्ठ शिष्यांनी नृत्य सादरीकरण केले. त्यानंतर सगळ्याच बालशिष्यांनी सप्तक ही तीनतालमधील बंदिश सादर केली. कार्यक्रमात पं. बिरजू महाराजांची नृत्यसंरचना असलेला तराणा सादर करण्यात आला. ज्यात तीनतालांतील तोडे, तिहाई, ततकार प्रस्तुत करण्यात आले. रागसागर ही रागमालेवर आधारित रचना प्रस्तुत झाली. शास्त्रीय संगीतातील नऊ राग आणि त्याच्या स्वरूपाचे विस्तृत वर्णन नृत्यातून सादर करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचा पूर्वार्ध स्वत: संस्थेच्या भक्ती देशपांडे यांच्या आकर्षक नृत्याने समाप्त झाला. उत्तरार्धात प्रथम, समग्र, झपताल सादर झाला. त्यानंतर संस्थेच्या संचालिका विद्या देशपांडे यांनी ‘प्रीत करी काहू सुख ना लयो’ हे भजन सादर केले. त्यांच्या अभिनय कौशल्याने रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते विदुषी शाश्वती यांचे एकल नृत्य. त्यांनी एक ‘अनेक रूप मै देखू’ हे भजन सादर केले. तसेच तीनतालातील बंदिशी प्रस्तुत केली. कार्यक्रमास पुष्कराज भागवत (संवादिनी), अमित मिश्रा (तबला), कल्याण पांडे (तबला), प्रतीक पंडित (सतार) यांची संगीत साथ लाभली. मिहिर म्हसाणे यांचे ध्वनिसंयोजन, विनोद राठोड यांची प्रकाशयोजना होती. शायोंती तलवार यांनी निवेदन केले. नितीन बिल्दीकर व महेश कावळे यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचा:

The post नाशिक : पं. बिरजू महाराजांना नृत्यमय आदरांजली appeared first on पुढारी.

Exit mobile version