Site icon

नाशिक : पडत्या काळात ‘आधार’ बनलेल्या गावच्या वैभवाला पाच लाखांचे दान!

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा

पडत्या काळात अनेक वर्षे शाळेचे वर्ग भरण्यासाठी गावचे वैभव असलेल्या ज्या ग्रामदैवत मंदिरांचा ‘आधार’ घेतला, त्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी खारीचा वाटा उचलून नगरसूल शिक्षण मंडळाने तब्बल पाच लाखांचे दान दिले. ‘त्या’ दिवसांची अशा पद्धतीने परतफेड करून संस्थेने समाजासमोर वेगळा आदर्श उभा केला असून, त्याचे पंचक्रोशीत स्वागत केले जात आहे.

येवला तालुक्यातील नगरसूल गावचे वैभव असलेल्या ग्रामदैवत मंदिरांचा जीर्णोद्धार होत आहे. याच मंदिरांमध्ये काही वर्षे शाळेचे वर्ग भरले जात असायचे. गावाचा हा पुरातन ठेवा जतन करण्यासाठी नगरसूल शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक स्व. मुरलीधर पाटील यांच्या स्मरणार्थ जनरल सेक्रेटरी प्रमोद पाटील व पाटील परिवार यांच्यासह संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांच्या पुढाकाराने येथील मारुती मंदिर, संत शिरोमणी सावता महाराज व शनिमंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष निकम, ज्येष्ठ नेते प्रभाकर निकम, कारभारी अभंग, प्रदीप निकम, अनिल निकम यांच्याकडे पाच लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी सहसचिव प्रवीण पाटील, माजी सरपंच प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. मारुती मंदिराच्या सभागृहात सुरुवातीला कित्येक वर्षे संस्थेची शाळा भरली जात होती. हळूहळू संस्थेचा विस्तार होत गेला आणि मंदिर पुरातन होत गेले. त्यामुळे या प्रेमाची उतराई करत ही लोकवर्गणी देण्यात आली, असे सांगत मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष निकम व प्रभाकर निकम यांनी प्रमोद पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. प्राचार्य बी. एस. पैठणकर, प्राचार्य शरद ढोमसे, मुख्याध्यापक सुरेश अहिरे, मुख्याध्यापक एस. सी. जाधव, मार्गदर्शक अनिल साळुंखे, उपप्राचार्य डी. बी. नागरे, पर्यवेक्षक मंगेश नागपुरे, आवारे, सुदाम गाडेकर, गंगाधर मोकळ, जनार्दन पुंड, बळवंत थोरात, सीताराम पैठणकर, राजेंद्र पगारे, जयराम पैठणकर आदींसह नगरसूलचे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांनी प्रमोद पाटील यांना फेटा बांधून शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक विभागप्रमुख राजाराम बिन्नर यांनी सूत्रसंचालन केले.

गावाचे श्रद्धास्थान असलेले मारुती मंदिर गावाचे भूषण आहे. येथे शाळेचे वर्गही भरले जात होते. या मंदिराचा जीर्णोद्धार ग्रामस्थ करत असून, यासाठी मदतीचा हात देण्याचे ठरवले आणि संस्थेतील सर्व सहकाऱ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. वाढदिवसाच्या निमित्ताने ही वचनपूर्ती केली त्याचा आनंद आहे. – प्रमोद पाटील, जनरल सेक्रेटरी, शिक्षण प्रसारक मंडळ, नगरसूल.

हेही वाचा:

The post नाशिक : पडत्या काळात 'आधार' बनलेल्या गावच्या वैभवाला पाच लाखांचे दान! appeared first on पुढारी.

Exit mobile version