
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पतीला चार काेटी रुपयांची लाॅटरी लागली असे सांगून भामट्यांनी ८० वर्षीय वृद्धेस चार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पाेलिस ठाण्यांत दाेन बँक खातेधारक व आंतरराष्ट्रीय व्हाॅट्सऍपधारकाविरुद्ध आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरला गर्ग (रा. सिमेन्स काॅलनी, पाथर्डी फाटा) असे फसवणूक झालेल्या वृद्धेचे नाव आहे. सरला यांचे पती भारत पेट्राेलिअम कंपनीत संचालक हाेते. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले आहे. दरम्यान, सरला या ३ ते २० एप्रिल २०२३ या कालावधीत घरी असताना त्यांना आंतराष्ट्रीय व्हाॅटस ऍप क्रमांकावरुन फाेन आला, तसेच लाॅटरीबाबत मेलही आला. त्यावेळी संशयित सायबर भामट्याने त्यांना‘तुमच्या पतीस चार काेटी रुपयांची लाॅटरी लागली आहे, ते पैसे तुम्हाला मिळण्यासाठी आम्ही सांगतो तसे करा’ असे सांगितले. सरला यांनी भामट्यावर विश्वास ठेवत त्याने सांगितल्यानुसार टॅक्स, रजिस्ट्रेशनच्या नावे वेळाेवेळी दाेन वेगवेगळ्या एचडीएफसी बँक खात्यात ४ लाख ३८ हजार रुपये भरले. पैसे भरुन साडेतीन महिने उलटले तरी लाॅटरीचे पैसे बँक खात्यात जमा हाेत नसल्याने सरला यांना संशय आला. त्यानुसार त्यांनी पाेलिसांना संपर्क करत तक्रार अर्ज दिला. पाेलिसांनी अर्जाची पडताळणी केली असता साडेचार लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समाेर आले. त्यानुसार सायबर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार अर्जानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यात युनायटेड किंग्डम येथील व्हाट्स अॅप नंबरचा काॅल व दाेन एचडीएफसीचे खाते नंबर मिळाले आहेत. ज्या खात्यांत रक्कम वर्ग झाली आहे, त्याबाबत बँकेशी संपर्क साधून कारवाई सुरु आहे. व्हाटस् अॅप नंबर व मेल आयडी मिळाला असून त्याचीही पडताळणी सुरु आहे.
-रियाज शेख,
वरिष्ठ पाेलिस निरीक्षक
हेही वाचा :
- Rahul Gandhi | राहुल गांधी जाणार वायनाडला, खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतरचा पहिला दौरा
- खेड एमआयडीसीतील रस्त्याला मोठमोठे खड्डे
- मावळ तालुक्यात खरीप पिके जोमात
The post नाशिक : पतीला लाॅटरी लागल्याचे सांगून वृद्धेला चार लाखांचा गंडा appeared first on पुढारी.