नाशिक : पत्नीच्या खुनाबद्दल जन्मठेप

जन्मठेप,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा गळा चिरून खून करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सिन्नर येथे जून २०१७ मध्ये ही खुनाची घटना घडली होती.

विलास शंकर मोकळ (रा. हेरंब सोसायटी, सिन्नर) असे या आरोपीचे नाव आहे. तो पेशाने शिक्षक असून त्याने पत्नी संगीता मोकळ हिचा निर्घृण खून केला होता. दाखल गुन्ह्यानुसार मोकळ हा आई, पत्नी व दोन मुलांसमवेत राहात होता. तो त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद व्हायचे. १९ जून २०१७ ला सायंकाळी 5 नंतर त्यांची मुले घराबाहेर खेळायला, तर आईदेखील बाहेर गेल्याची संधी साधून, विलासने पत्नीचा ब्लेडने गळा चिरला, तसेच हाताच्या नसाही कापल्या. यासाठी त्याने तीन ब्लेड वापरले होते. त्यानंतर त्याने घराच्या मुख्य दरवाजाला आतून कडी लावून घेत मागील दाराने पसार झाला होता.

आपण गुन्हा केला नाही, हे दाखवण्यासाठी तो घराजवळील एका बारमध्ये जाऊन सीसीटीव्हीत दिसेल या पद्धतीने मद्यसेवन करत बसला होता. दरवाजा उघडत नसल्याचा त्याला फोन आल्यानंतर तो पुन्हा घरी परतला. काही माहिती नाही, अशा अविर्भावात त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मागील बाजूने घरात शिरला. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडून सर्वांना घरात घेतले. पत्नीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पाहून हंबरडा फोडला. त्यानंतर त्यानेच सिन्नर पोलिसांना माहिती दिली. पत्नीचा घातपात किंवा तिने आत्महत्या केल्याचा संशयही त्याने वर्तवला होता. या प्रकरणी सिन्नर पोलिसांत संगीता मोकळ यांचा भाऊ जनार्दन खंडीझोड यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सिन्नर पोलिस ठाण्यातील तत्कालीन सहायक निरीक्षक सय्यद यांनी तपास करत पुराव्यांच्या आधारे विलासला अटक केली व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. सुलभा सांगळे यांनी युक्तिवाद केला. खून केल्यानंतर विलास बारमध्ये गेला व मुद्दाम सीसीटीव्हीसमोर बसून मद्यसेवन केले. मात्र तो सतत सीसीटीव्हीकडे पाहात असल्याने पोलिसांना संशय आला होता. त्यातच घराच्या मागील बाजूस भिंतीलगत विटा रचल्यानेही संशयास वाव मिळाला. ॲड. सांगळे यांनी न्यायालयात १५ साक्षीदार तपासले. विलास व संगीता यांच्या १२ वर्षांच्या मुलाने दिलेली साक्षही महत्त्वाची ठरली. तसेच वैद्यकीय अधिकारी, फॉरेन्सिकचा अहवाल महत्त्वाचा ठरला. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश मीर्दिला भाटिया यांनी परिस्थितिजन्य पुराव्यांआधारे विलासला शिक्षा सुनावली.

हेही वाचा : 

The post नाशिक : पत्नीच्या खुनाबद्दल जन्मठेप appeared first on पुढारी.