Site icon

नाशिक : ‘पदवीधर’मध्ये संकटमोचकाची एन्ट्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक पदवीधर मतदारसंघावर झेंडा फडकविण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली असून, पक्षाने निवडणुकीची जबाबदारी ही संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे ना. गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली आहे. ना. महाजनांच्या एन्ट्रीमुळे निवडणुकीत अधिक रंग भरणार आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेला पदवीधर मतदारसंघ हा निर्मितीपासूनच भाजपचा गड राहिला आहे. मात्र, 2009 ची पोटनिवडणूक आणि त्यानंतरच्या सलग दोन टर्ममध्ये काँग्रेसचे आ. सुधीर तांबे यांनी मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व राखल्याने भाजपची कोंडी झाली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पक्षातील संकटमोचक अशी ओळख असलेल्या ना. महाजन यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी दोन महिन्यांपूर्वी उमेदवार घोषित करून निवडणुकीत आघाडी घेणार्‍या काँग्रेससाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे. त्याचवेळी पक्षांतर्गत पाचही जिल्ह्यांतील सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे शिवधनुष्य महाजनांना पेलावे लागणार आहे. पदवीधरसाठी भाजपमधून यंदा इच्छुकांची रीघ लागली आहे. नगरमधून राजेंद्र विखे-पाटील, नाशिकमधून डॉ. प्रशांत पवार आणि हेमंत धात्रक तसेच धुळ्यातून धनंजय विसपुते हे तिकिटाकरिता प्रयत्न करीत आहेत. असे असले, तरी काँग्रेसकडून हा मतदारसंघ पुन्हा एकदा हिसकावून घेताना विधान परिषदेत आपली ताकद वाढविण्यासाठी भाजप उत्सुक आहे. त्यामुळे की काय, तीन दिवसांपासून नामनिर्देशन अर्ज दाखल भरण्यास सुरुवात झाली असूनही, भाजपने अजूनही उमेदवारांचे पत्ते उघडलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशातच भाजपने निवडणूकप्रमुख म्हणून ना. महाजनांची नियुक्ती केली आहे. पक्षाने सोपविलेली जबाबदारी बघता ना. महाजनांपुढे पदवीधरचा गड काबीज करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

अनुभव लागणार पणाला..
2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ना. गिरीश महाजन यांच्या रणनीतीमुळे तत्कालीन भाजप-शिवसेनेला उत्तर महाराष्ट्रात फायदा झाला. मात्र, गत तीन वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यातच पदवीधरचा आखाडा सर्वार्थाने वेगळा आहे. त्यामुळे ना. महाजन यंदाच्या निवडणुकीत कोणती रणनीती राबविणार, यावर भाजपच्या यशापयशाची मदार ठरणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘पदवीधर’मध्ये संकटमोचकाची एन्ट्री appeared first on पुढारी.

Exit mobile version