Site icon

नाशिक : ‘पदवीधर’साठी अवघी 4,766 नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात संथगतीने नोंदणी सुरू आहे. महिनाभरात प्रशासनाकडे नोंदणीकरिता अवघे 4 हजार 773 पदवीधरांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी प्रशासनाने 7 अर्ज अपात्र ठरविले आहेत. नोंदणीसाठी 7 नोव्हेंबरची अंतिम मुदत असून अधिकधिक पदवीधरांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे.

पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने आतापासूनच निवडणुकीच्या तयारीवर भर दिला आहे. पहिल्या टप्प्यात 1 ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर या पाचही जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही नोंदणीची प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, नाशिकमधून नोंदणीला अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्याचे पाहायला मिळत आहे. 2017 मध्ये पदवीधर मतदारसंघासाठी एकट्या नाशिक जिल्ह्यातून 96 हजार मतदारांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा 30 दिवसांमध्ये केवळ 4 हजार 766 पदवीधरांची नोंद झाली आहे. त्यामागे मतदार नोंदणीसाठीची किचकट प्रक्रिया कारणीभूत ठरत आहे. नाशिक शहरातील चारही मतदारसंघांतून केवळ 591 अर्ज प्रशासनाकडे आले असून, त्या तुलनेत ग्रामीण भागातून नोंदणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीइतपत मतदार नोंदणीचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. त्यानुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था व खासगी आस्थापनांना त्यांच्याकडील पदवीधरांच्या नोंदणीची सूचना केली आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना कितपत यश लाभते, हे 7 नोव्हेंबरनंतर स्पष्ट होईल.

शहरात 37 नोंदणी केंद्रे…
केंद्रीय निवडणूक आयोगाने पदवीधरसाठी अर्ज करताना प्रथम गॅझेटेड अधिकार्‍यांकडून कागदपत्रांची पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक शाखेने त्यासाठी शहरात 37 ठिकाणी नोंदणी केंद्रे कार्यान्वित केली आहेत. याशिवाय जिल्ह्यातील सर्व सर्व मंडल अधिकारी, तहसीलदार व प्रांत कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. पदवीधरांना आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येईल.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘पदवीधर’साठी अवघी 4,766 नोंदणी appeared first on पुढारी.

Exit mobile version