नाशिक पदवीधरसाठी नगर जिल्ह्यात सर्वांधिक मतदार नोंदणी

नाशिक पदवीधर मतदारसंघ www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदार संघासाठी विभागात सर्वांधिक मतदार नोंदणी अहमदनगर जिल्ह्यात झाली असून त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात मतदार नोंदणी झाली आहे.  या मतदारसंघासाठी दोन लाख 58 हजार 444 मतदारांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे, तरीही पाच जानेवारीपर्यंत आणखी मतदार नोंदणीसाठी संधी असल्याने पदवीधरांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदारसंघासाठी 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत धुळे जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर मतदान होईल, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, या निवडणुकीची अधिसूचना 5 जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात येईल. नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा शेवटचा दिनांक 12 जानेवारी राहील. नामनिर्देशन पत्रांची 13 जानेवारी रोजी छाननी होईल. 16 जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक राहील. 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल, तर 2 फेब्रुवारी, 2023 रोजी मतमोजणी होईल. 4 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. या निवडणुकीसाठी पदवीधर मतदार मतदान करतील.

या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील तर धुळे जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी शर्मा हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.

या निवडणूकीसाठी अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक पदवीधरांनी नोंदणी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात एक लाख 16 हजार 319 पदवीधरांनी मतदार नोंदणी केली असून त्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात 66 हजार 709 मतदारांनी नोंदणी केली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात 19279, जळगाव जिल्ह्यात 33544 तर धुळे जिल्ह्यात 22593 पदवीधरांनी मतदार नोंदणी केली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिध्दी झाल्यानंतरही मतदार नोंदणी उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 12 जानेवारीपर्यंत करता येणार आहे. असे असले तरी त्यापूर्वी 7 दिवस म्हणजेच 5 जानेवारीपर्यंत प्राप्त अर्जांवरच निर्णय होईल. त्यामुळे नागरीकांनी शेवटच्या दिवसांपर्यंत मतदार नोंदणीसाठी वाट न बघता तात्काळ मतदार नोंदणी करण्याचे आवाहन शर्मा यांनी केले आहे.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी धुळे जिल्ह्यात एकूण 29 प्रारुप मतदार केंद्रांची यादी आज प्रसिध्द करण्यात आली असून या यादीवर 5 जानेवारीपर्यंत सुचना व हरकती नोंदविता येणार आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्र व मतदार संख्या पुढील प्रमाणे आहे. साक्री तालुक्यात 5 केंद्र व 2864 मतदार, धुळे ग्रामीणमधे 7 केंद्र व 4707 मतदार, धुळे शहरात 8 केंद्र व 7221 मतदार, शिंदखेडा तालुक्यातील 3 केंद्र व 2127 मतदार तर शिरपूरमधे 6 केंद्र व 5674 मतदार असे एकूण 29 मतदार केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर विविध कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. याची धुळे जिल्ह्यातील संभाव्य उमेदवार, मतदार, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले.

हेही वाचा :

The post नाशिक पदवीधरसाठी नगर जिल्ह्यात सर्वांधिक मतदार नोंदणी appeared first on पुढारी.