नाशिक पदवीधरसाठी प्रशासनाकडून तयारी : ९९ केंद्रे अंतिम, ४८० अधिकारी नियुक्त

पदवीधर निवडणूक नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना जिल्हा प्रशासनाने मतदानासाठीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात ६९ हजार ६५२ पदवीधर मतदारांची नाेंदणी झाली असून, प्रशासनाने अंतिमत: ९९ मतदान केंद्रे अंतिम केली आहेत.

गेल्या आठवड्याभरापासून नाशिक पदवीधरचा आखाडा गाजत आहे. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय नाट्यांमुळे ही निवडणूक राज्यभरात प्रतिष्ठेची बनली आहे. निवडणुकीत सोमवारी (दि. १६) माघारीची प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतिमत: १६ उमेदवार रिंगणात राहिले आहे. येत्या ३० तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने आता प्रशासनही तयारीला लागले आहे.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यातील अंतिम मतदार संख्या ६९ हजार ६५२ वर पोहोचली आहे. त्यामध्ये ४५ हजार ८६१ स्त्री व २३ हजार ७९१ पुरुष मतदार आहेत. तर १५ तालुक्यांत ९९ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तसेच मतदानासाठी ४८० अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासनाने केली असून, त्यात १२० मतदान केंद्राध्यक्ष आणि ३६० मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मतमाेजणीचीही तयारी

मतदारसंघासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांत मतदान घेण्यात येणार आहे. दि. २ फेब्रुवारीला मतमोजणीची पार पडणार आहे. त्यामुळे मतमोजणीसाठीही प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. आवश्यक मनुष्यबळ अन्य साहित्याची जुळवाजुळव केली जात आहे. तसेच येत्या २३ तारखेला अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानासंदर्भातील प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक पदवीधरसाठी प्रशासनाकडून तयारी : ९९ केंद्रे अंतिम, ४८० अधिकारी नियुक्त appeared first on पुढारी.