नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही : संजय राऊत, मातोश्रीवर होतेय बैठक

संजय राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही, कुणाला पाठिंबा द्यायचा यासंदर्भात मातोश्रीवर बैठक होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत म्हणाले, विरोधी पक्षात असतानाही मविआत समन्वय असणे आवश्यक आहे. 12 वाजता निवडणूकीसंदर्भात मातोश्रीवर त्यासंदर्भात बैठक घेणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही. ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने एकत्रितपणे सरकार चालवलं, तोच समन्वय तोच एकोपा विरोधी पक्षात काम करत असतानाही असायला हवा. तरच आपण सर्व लढाया एकत्रितपणे लढू शकतो अशी शिवसेनेची भूमिका आहे. नाशिक पदवीधर निवडणूकीच्या बाबतीत गोंधळ झाला आहे, हे मान्य करावेच लागेल. मात्र केवळ कॉंग्रेस पक्ष समजून नव्हे तर महाविकास आघाडी समजूनच त्याकडे बघायला पाहिजे. पदवीधरच्या पाचही जागांसंदर्भात एकत्रित बसून निर्णय व्हायला हवा होता. नागपूर अमरावती जागेसंदर्भात काळजी पूर्वक निर्णय होणं अपेक्षित होतं, ते झालं नाही, कुणाला दोष देत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र अखेरच्या दिवशी सुधीर तांबे यांनी माघार घेत अर्जच भरला नाही. सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. अखेरच्या दिवशी घडलेल्या या राजकीय नाट्यामुळे कॉंग्रेसला चांगलाचा धक्का बसला. दरम्यान सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचे कॉंग्रेसने जाहीर केल्याने सत्यजित तांबे वगळता कॉंग्रेस कोणत्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार हे पाहावे लागणार आहे.

The post नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नाही : संजय राऊत, मातोश्रीवर होतेय बैठक appeared first on पुढारी.