नाशिक पदवीधर निवडणूक : भाजपची खेेळी, कॉंग्रेस रिंगणाबाहेर

फडणवीस, सत्यजीत तांबे,www.pudhari.news

नाशिक : गौरव जोशी

अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज भरायच्या अखेरच्या क्षणी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेत पुत्र सत्यजित तांबे यांना पुढे चाल दिली, तर अटीतटीच्या या लढतीत भाजपने ऐनवेळी उमेदवार न देता कॉंग्रेसवर कुरघोडी करत निवडणुकीतील हवाच काढून घेतली. त्यामुळे निवडणूक घोषित झाल्यापासून लक्षवेधी ठरलेल्या या लढतीची वाटचाल आता बिनविरोधच्या दिशेने होत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्हे, आठ लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेचे ४८ मतदारसंघ असलेल्या नाशिक पदवीधर मतदासंघावर वर्चस्व राखण्यासाठी कॉंग्रेसने पहिल्यापासून तयारी सुरू केली हाेती. निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ. तांबे यांनी पाचही जिल्हे पिंजून काढत आघाडी घेतली खरी. परंतु, अर्ज दाखल करायच्या अखेरच्या क्षणी पक्षाचा एबी फाॅर्म हाती असूनही त्यांनी माघार घेत पुत्र सत्यजित यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविल्याने कॉंग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे, तर भाजपसाठी हा आनंदाचा क्षण आहे.
पदवीधरसाठी अखेरपर्यंत आपले पत्ते ओपन न करणाऱ्या भाजपने निवडणुकीत अधिकृत उमेदवार दिला नव्हता. याउलट अपक्ष तांबे यांच्यामागे उभे राहण्याची तयारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखविली आहे. त्यामुळे निवडणुकीतील भाजपने खेळलेली चाल ही कॉंग्रेससाठी भविष्यात धोकादायक असली, तरी यासर्व घडामोडींमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय खेळी कामी आल्याची चर्चा आहे.

नगरमध्ये भाजपचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे – पाटील तसेच आ. राम शिंदे हे मातब्बर नेते असले, तरी जिल्ह्यात म्हणावी तशी ताकद पक्षाची नाही. त्यामुळे सत्यजित यांच्या रूपाने युवा नेता भाजपमध्ये आणण्याचा बेत ना. फडणवीस यांनी आखला होता. सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात फडणवीस यांनी व्यासपीठावरून तांबेंना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तेव्हापासूनच सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेची पायरी चढण्याची तयारी केल्याचे समजते आहे. त्यासाठी तीन टर्म मतदारसंघावर एकहाती पकड निर्माण करणारे पिता डॉ. सुधीर तांबे यांना थांबविण्यात सत्यजित यशस्वी ठरले. डॉ. तांबे यांनीही युवा नेतृत्वाकडे कमान सोपविण्याची तयारी दाखवित ऐनवेळी माघार घेतली असली, तरी त्यांना थांबविण्यात भाजपचे संकटमोचक तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत.

निवडणूक बिनविरोधसाठी सत्यजित तांबे यांनी सर्वच राजकीय पक्षांचे उंबरठे झिझविण्याची तयारी दाखविली आहे. त्याचवेळी भाजपमधील घडामोडी बघता, पक्ष तांबेंच्या मागे खंबीर उभा राहील, यात कोठेही शंका नाही. त्यामुळे तांबे यांचा विजय सुकर मानला जात आहे. परंतु, निवडणुकीत जाता-जाता ना. फडणवीस यांनी खेळलेली खेळी ही येत्या काळात उत्तर महाराष्ट्रातील राजकारणासाठी वेगळी दिशा देणारी ठरणार आहे. येत्या दीड वर्षात लोकसभा आणि विधानसभेचा बार उडणार आहे. अशावेळी भाजपमधील नेते आणि विद्यमान लोकप्रतिनिधींना एकप्रकारे तिकिटावरून पक्षाला गृहीत न धरण्याचा मेसेज या खेळीतून देण्यात आला. तसेच नगरमधून विखे-पाटील यांना पर्याय निर्माण करत पक्षांतर्गत त्यांचे पक्ष छाटण्याचे काम फडणवीसांनी लीलया केले. मात्र, या सर्वांवर कडी म्हणजे शिवसेनेपाठोपाठ आता उत्तर महाराष्ट्रात त्यातही विशेष करून नगरमध्ये बलवान असलेली काँग्रेस फोडण्याचे भाजपचे प्रयत्न पदवीधरच्या निमित्ताने अधोरेखित झाले. त्यामुळे मरणावस्थेत असलेल्या काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांसाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक पदवीधर निवडणूक : भाजपची खेेळी, कॉंग्रेस रिंगणाबाहेर appeared first on पुढारी.