नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्राला पोलिस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं…

नाशिक पदवीधर निवडणूक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यात काटे टक्कर असल्याने कायदा व सुव्यवस्थएचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. सुमारे पावणेचारशे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने मतमोजणी केंद्राला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. हे चित्र रात्री उशिरापर्यंत कायम होते.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. या निवडणुकीच्या रूपाने भाजपविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याच्या शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्थएच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपअधीक्षक-१, पोलीस निरीक्षक- ४, उपनिरीक्षक- १५, कर्मचारी- ८६ तर होमगार्ड- २७ असे 246 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मतपेट्या ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमसाठी मतदानापासून स्वतंत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामध्ये एका पोलीस उपअधीक्षकांसह दोन पोलीस निरीक्षक, सात सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, 30 कर्मचारी व 30 होमगार्ड आदींचा समावेश आहे. दरम्यान, मतदान केंद्र व स्ट्रॉंगरूम यांच्यासाठी दोन शिफ्टमध्ये तब्बल 386 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना ड्युटी लावण्यात आली होती. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी आढळून येत होते.

पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

मतमोजणी केंद्राची पोलीस अधीक्षक शहाजी उपम यांनी दुपारी बारा वाजता पाहणी करत आढावा घेतला. केंद्राबाहेर त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले, कविता फडतरे, पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव आदींसह वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्राला पोलिस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं... appeared first on पुढारी.