नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजित तांबे यांचा अर्ज वैध, छाननीत ७ उमेदवारांचे अर्ज बाद

सत्यजित तांबे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी (दि. १३) अर्ज छाननी प्रक्रियेत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा अर्ज वैध ठरला. छाननीवेळी सात उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे रिंगणात २२ उमेदवार शिल्लक आहेत. विशेष म्हणजे यात राष्ट्रीय पक्षाचा एकही उमेदवार नाही. सोमवारी (दि. १६) अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडणार आहे.

अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, तरी यावेळी चर्चेत राहिली ती पिता-पुत्र तांबे यांची राजकीय खेळी. उमेदवारी अर्जाच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी (दि. १२) काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी पुत्र सत्यजित यांच्या हट्टापुढे नमते घेत अखेरच्या क्षणापर्यंत नामनिर्देशन सादर न करत निवडणुकीमधून माघार घेतली. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, तर निवडणुकीत पहिल्या दिवसापासून विजयाचा दावा करणाऱ्या भाजपने पराभव स्पष्ट दिसत असल्याने शेवटपर्यंत पक्षांतर्गत इच्छुकांना झुलविताना अधिकृत उमेदवार उभा केला नाही. सत्यजित तांबे यांना चाल देण्यासाठी भाजपने आखलेल्या रणनीतीत काँग्रेस ताेंडघशी पडली. पण निवडणुकीच्या रणांगणात उमेदवार न देणाऱ्या भाजपच्या हारकिरीचा चर्चा रंगल्या असताना सर्वांच्या नजरा अर्ज छाननीकडे लागल्या होत्या.

विभागीय आयुक्तालयात शुक्रवारी (दि. १३) सकाळी ११ पासून छाननीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर ७ अपक्षांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांत आयोगाकडे नोंदणीकृत मान्यतापात्र नसलेल्या पक्षांचे तीन उमेदवार आहेत. त्यात वंचित आघाडीचे रतन कचरू बनसाेड, हिंदुस्थान जनता पार्टीचे दादासाहेब पवार आणि नॅशनल ब्लॅक पँथरचे सुरेश पवार यांचा समावेश असून, उर्वरित सर्व १९ उमेदवार अपक्ष आहेत. सोमवार (दि. १६)पर्यंत माघारीसाठीची मुदत असून, त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

यांचे अर्ज ठरले बाद

सोमनाथ नाना गायकवाड, भागवत धोंडिबा गायकवाड, सुनील उदमले, शरद मंगा तायडे, राजेंद्र मधुकर भावसार, यशवंत केशव साळवे आणि छगन भिकाजी पानसरे.

डॉ. निपुण विनायक निवडणूक निरीक्षक

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदारसंघात निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. निपुण विनायक यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीबाबत डॉ. निपुण यांच्याशी संपर्क साधायचा असल्यास त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9834874768 असा आहे.

हेही वाचा :

The post नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजित तांबे यांचा अर्ज वैध, छाननीत ७ उमेदवारांचे अर्ज बाद appeared first on पुढारी.