नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारयादी प्रसिद्ध, अशी आहे आचारसंहिता

मतदान, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली असून, २ लाख ५८ हजार ३५१ मतदारांची नोंद झाली आहे. नामनिर्देशन दाखल करायच्या अंतिम दिवसापर्यंत म्हणजे १२ जानेवारीपर्यंत ऑनलाइन मतदार नोंदणी करता येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील २ पदवीधर आणि तीन शिक्षक मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचा बिगुल वाजला आहे. आयोगाच्या कार्यक्रमानुसार ३० जानेवारीला मतदान तसेच २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.३०) गमे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. विभागातील पाचही जिल्ह्यांच्या अंतिम मतदारयाद्या प्रशासनाने प्रसिद्ध केल्या आहेत. यंदा २ लाख ५८ हजार ३५१ मतदारांची नोंदणी झाली असून, २०१७ ला विभागात दोन लाख ५६ हजार मतदार संख्या होती. नगरमध्ये सर्वाधिक १ लाख १६ हजार ३१९ मतदार आहेत. नाशिकमध्ये ६६,७०९ मतदारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. उमेदवारी अर्जाच्या अंतिम मुदतीपर्यंत नोंदणी करता येणार असल्याने मतदारसंख्येत वाढ होईल, असा गमे यांनी विश्वास व्यक्त केला.

पदवीधर निवडणूक ही मतपत्रिकेवर घेतली जाणार असून, पसंतीक्रमानुसार मतमोजणी होणार आहे. निवडणुकीमध्ये अर्ज भरायची तसेच अर्जांची सर्व प्रक्रिया ही विभागीय आयुक्त स्तरावर पार पडणार आहे. जिल्हास्तरावर केवळ मतदान केंद्रांची सुविधा तसेच मतपेट्या व अन्य साहित्याची उपलब्धता करून दिली जाईल. निवडणुकीवेळी कोविडच्या सर्व सूचनांचे पालन करण्यात येईल, असे गमे यांनी सांगितले. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, महसूल उपायुक्त उन्मेष महाजन व प्रज्ञा बढे-मिसाळ यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

होऊ द्या खर्च

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक खर्चावर कोणतीही बंधने नाहीत. उमेदवारांना सढळ हाताने खर्च करता येणार आहे. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चांदी असणार आहे.

विभाग मतदारसंख्या

जिल्हा -मतदार- मतदान केंद्र

नाशिक- 66709 -99

नगर -116319- 147

जळगाव- 33544- 40

धुळे- 22593- 29

नंदुरबार- 19186- 23

एकूण -258351- 338

—————

अशी आहे आचारसंहिता

-तालुकास्तरावर फिरते पथक ठेवणार वॉच

-स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहने वापरास बंदी

-शैक्षणिक संस्थांचे उद‌्घाटन, शासकीय दौऱ्यांवर बंधने

-राजकीय पक्षांचे पोस्टर्स, घोषणापत्रके, झेंडे, फलक, चिन्ह काढणार

-आयोग देणार स्वतंत्र निवडणूक निरीक्षक

-शासकीय कामांचे उद‌्घाटन, नवीन कामांना मनाई

-मतदारांवर प्रभाव पडेल अशा लोकाभिमुख योजनांचे संस्करण थांबवावे लागणार

-लोकसभा-विधानसभा आचारसंहिता जशीच्या तशी लागू असेल

-मालमत्तांचे विद्रुपीकरण केल्यास ३ महिने तुरुंगवास, दोन हजारांच्या दंडाची तरतूद

हेही वाचा :

The post नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारयादी प्रसिद्ध, अशी आहे आचारसंहिता appeared first on पुढारी.