नाशिक : पदवीधर मतमोजणीने निवडणूक गोदामाचा श्रीगणेशा

godown www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ झाला असून, 30 जानेवारीला मतदान आणि 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. प्रशासकीय स्तरावर निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. यंदा पहिल्यांदाच जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यद प्रिंपी येथील नूतन गोदामात मतमोजणी होणार असून, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 2 दिवसांपूर्वी गोदामाची पाहणी केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सय्यद पिंप्रीत 5 एकर जागेवर जिल्हा निवडणूक शाखेने स्वमालकीचे गोदाम उभारले आहे. यात दोन मोठे हॉल, ईव्हीएम स्ट्राँगरूम, निवडणूक निरीक्षक केबिनसह कर्मचार्‍यांसाठी प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यासाठी पायलट प्रकल्प असलेल्या या सुसज्ज वास्तूची उभारणी पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे पदवीधर निवडणुकीनिमित्त या वास्तूच्या लोकार्पणाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. पदवीधर मतदारसंघासाठी पाचही जिल्ह्यांत 30 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानंतर 2 फेब्रुवारीला सय्यद प्रिंपीतील गोदामात पाचही जिल्ह्यांची एकत्रित मतमोजणी करण्यात येईल. त्यादृष्टीने आयुक्त गमे यांनी दोन दिवसांपूर्वी गोदामाला भेट देऊन पाहणी केली. मतमोजणीच्या दृष्टिकोनातून तसेच वाहनतळ व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात यावेळी गमेंनी सहकारी अधिकार्‍यांना काही सूचना केल्या. त्यामुळे पदवीधरच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याला आणि विशेष करून निवडणूक शाखेला त्यांची हक्काची जागा वापरासाठी उपलब्ध होणार आहे.

सारे काही एकाच छताखाली…
जिल्ह्यात लोकसभा आणि विधान परिषदेच्या मतमोजणीसाठी अंबड येथील केंद्रीय अन्नधान्य महामंडळाचे गोदाम निवडणूक शाखेकडून भाडेतत्त्वावर घेतले जाते. त्यासाठी प्रशासनाला दर पाच वर्षांनी महामंडळाकडे पाठपुरावा करावा लागतो. मात्र, स्वमालकीच्या गोदामामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. जिल्ह्यातील 15 ही विधानसभा मतदारसंघांचे ईव्हीएम तसेच अन्य मतदान साहित्य एकाच छताखाली जतन करता येणार असल्याने प्रशासनाचा ताण हलका झाला आहे.

  • गोदामात भव्य दोन हॉल
  • वाहनतळासाठी प्रशस्त जागा
  • सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना
  • मुंबई-आग्रा महामार्गापासून हाकेच्या अंतरावर

हेही वाचा:

The post नाशिक : पदवीधर मतमोजणीने निवडणूक गोदामाचा श्रीगणेशा appeared first on पुढारी.