Site icon

नाशिक : परतीच्या पावसाने द्राक्षउत्पादकांवर आसमानी संकट

नाशिक, पालखेड मिरचिचे : पुढारी वृत्तसेवा

तालुक्याच्या उत्तर भागातील पालखेड, वावी, कुंभारी, रानवड, शिरवाडे-वणी, गोरठाण आदि परिसरात काल सायंकाळी व मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने द्राक्षउत्पादकांसह शेतकरी हतबल झाले आहे. अचानक आलेल्या या आसमानी संकटाने शेतक-यांचे कोट्यावधी रूपयाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यासह या परिसरातील द्राक्षउत्पादकांच्या द्राक्षछाटणीने वेग घेतला आहे. छाटणी केलेल्या द्राक्षवेलींवर आलेला नविन फुटवा काही ठिकाणी पावसाच्या टपो-या थेंबामुळे तुटुन पडला आहे. तर फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षघडांची कुज मोठ्या प्रमाणात होणार आहे.  फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागांची जर या पावसाने हानी झाली तर उत्पादकांचा संपुर्ण हंगाम वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यातच पावसाने विश्रांती घेतली नाही तर फुलोरा अवस्थेतील बागांचे शंभर टक्के नुकसान होऊन उत्पादकांना लाखो रूपयाचा आर्थिक फटका बसणार आहे. विविध प्रकारची बुरशीनाशके फवारतांनाही उत्पादकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अतिपावसाने जमिन पुर्णपणे दलदलीची झाल्याने फवारणीकरीता बागेत ट्रँक्टरही चालत नसल्याने पर्यायाने हाताने फवारणी करावी लागत आहे.  ही फवारणी होते ना होते तोच पावसाचे आगमन होत असल्याने फवारणी केलेली महागडी बुरशीनाशके पावसाच्या पाण्याने धुऊन जात आहे. यामुळे आर्थिक फटका उत्पादकांना बसू लागल्याने उत्पादक आसमानी -सुलतानी संकटात सापडला आहे.

गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी याच परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने परिसरातील शेतक-यांचे आतोनात नुकसान झाले होते. या परिस्थितीतून शेतकरी वर्ग सावरतो ना सावरतो तोच काल पुन्हा ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्याने रब्बी हंगामातील सोयाबिन, मका आदि पिकांचेही नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

ओला दुष्काळ जाहिर करावा: ढोमसे

पालखेडसह परिसरातील सर्वच गावात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतक-यांचे कधीही न भरून येणारे आर्थिक नुकसान झाले आहे. सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षउत्पादकांची अवस्था तर अतिशय वाईट आहे. वर्षभर पोटच्या पोराप्रमाणे द्राक्षवेलींची जोपासना करूनदेखील हातातोंडाशी आलेला घास निसर्ग अशा पद्धतीने हिरावून घेत असेल तर त्याची दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न शेतक-यांपुढे निर्माण झाला आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पिंपळगांव बाजार समितीचे माजी संचालक तथा गोरठाणचे द्राक्षउत्पादक माधव ढोमसे यांच्यासह शेतक-यांनी केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : परतीच्या पावसाने द्राक्षउत्पादकांवर आसमानी संकट appeared first on पुढारी.

Exit mobile version