नाशिक : परतीच्या पावसाने पुन्हा गंगापूरची कवाडे खुली

गंगापूर धरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातलेले असताना प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गंगापूरची दारे पुन्हा उघडण्यात आली असून, धरणातून 571 क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे. तसेच दारणा, पालखेडसह अन्य प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पूरसद्दश परिस्थिती निर्माण झाली आहे.

चार दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे. सिन्नर, येवला, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी आदी तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. अन्यही तालुक्यांत त्याचा जोर अधिक आहे. या पावसाने शेतीपिके पाण्यात गेली आहेत. दुसरीकडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी जलसंपदा विभागावर धरणांची दारे खुली करण्याची वेळ ओढावली आहे. पंधरा दिवसांपूर्वी बंद केलेला गंगापूर धरणाचा विसर्ग गुरुवारी (दि.20) पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून सकाळपासून 571 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदापात्रात केला जात आहे. त्यामुळे रामकुंड परिसरातील सांडवे पाण्याखाली गेले आहेत. आळंदीतून 30 क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

इगतपुरी तालुक्याला पावसाने दणका दिला असून, तालुक्यातील प्रमुख धरणांमध्ये वेगाने आवक होत आहे. त्यामुळे दारणामधून 1,100, मुकणेतून 250, कडवामधून 848, वालदेवीतून 65 क्यूसेक विसर्ग केला जातोय. याशिवाय भोजापूरमधून 2,398 तर पालखेडचा 3,496 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान वरील धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून 14 हजार 690 क्यूसेक वेगाने पाणी मराठवाड्याकडे झेपावत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : परतीच्या पावसाने पुन्हा गंगापूरची कवाडे खुली appeared first on पुढारी.