Site icon

नाशिक : पशुपक्ष्यांच्या दाणा-पाण्यासाठी सरसावले चिमुकले

नाशिक (चांदवड)  : पुढारी वृत्तसेवा
घरात वापरलेल्या वस्तू फेकून देण्यापेक्षा त्यापासून मुक्या पशुपक्ष्यांचे उन्हापासून संरक्षण करण्याचा संदेश येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील चिमुकल्यांनी कागदापासून घरटे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांपासून पाणी ठेवण्याचे भांडे बनवीत दिला आहे.

उन्हामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागते. पर्यायाने पक्ष्यांची काहिली होऊन जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पक्ष्यांचे जीव वाचवण्यासाठी दरवर्षी जैन विद्यालय विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तूपासून घरटे, पिण्याच्या पाण्याचे भांडे तयार करण्याचे प्रशिक्षण देते. यात शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊन घरटे, पाण्याचे भांडे बनवितात. या घरट्यांमध्ये बाजरी, गहू, बिस्किटे, तांदूळ यांसारखे खाद्यपदार्थ टाकले जातात. याच घरट्यांजवळ प्लास्टिकच्या बाटलीत पिण्याचे पाणी भरले जाते. हे घरटे व पाणी शाळेतील किंवा विद्यार्थ्यांच्या घराच्या परिसरातील झाडांवर ठेवले जातात. यामुळे पक्षी झाडावर बसल्यावर या ठिकाणी येतात. गहू, बाजरी, बिस्किटे खाऊन पाणीही पितात. पर्यायाने पक्ष्यांचे उन्हापासून रक्षण होऊन त्यांचे जीव वाचवण्यात विद्यार्थ्यांचा हातभार लागतो. उन्हापासून पशुपक्ष्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शहर, गावातील प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घराशेजारील झाडावर पक्ष्यांना खाण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून पक्ष्यांची उपासमार न होता त्यांचे प्राण वाचण्यास मदत होईल, यासाठी सर्व नागरिकांनी घराच्या सभोवताली पक्ष्यांसाठी सोय करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पशुपक्ष्यांच्या दाणा-पाण्यासाठी सरसावले चिमुकले appeared first on पुढारी.

Exit mobile version