नाशिक : पाऊस पडण्यासाठी महादेवाची पिंड पाण्यात बुडवून साकडे

महादेवाची पिंड बुडवली पाण्यात,www.pudhari.news

नाशिक, गणेश सोनवणे

येवला तालुक्यातील आंबेगाव गावच्या शेतकरी महिलांनी दुष्काळाचे निवारण व्हावे यासाठी एकत्र येत देवाला साकडं घातलं. पाऊस पडण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करुन प्रार्थना केली.

गेल्या काही महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यात म्हणावा असा पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकरी हवालदिल झाला असून शेतातील पिके पाण्याअभावी करपून जावू लागली आहे. आंबेगावातही तशीच परिस्थिती आहे. मका, सोयाबीन, बाजरी, गहू यासह शेतातील सर्वच पिकांना पावसाच्या पाण्याची आस आहे. चार-आठ दिवसांत चांगला पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येणार आहे.

त्यामुळेच पाऊस पडावा म्हणून सात दिवसांच्या भागवत सप्ताहाचे आयोजन आंबेगावात करण्यात आले होते. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी गावातील सर्व महिलांनी विहिरीतून व गावच्या आडातून हंड्याने पाणी वाहून आणत महादेवाच्या पिंडवर जलाभिषेक घातला. महिलांच्या मदतीला यावेळी गावातील तरुण-तरुणींनी देखील सहभाग घेतला.  गावासह संपूर्ण जिल्ह्यात पाऊस भरसू दे अशी प्रार्थना महिलांनी यावेळी केली. महिलांनी ओव्या गात वरुणराजाला साद घातली.

The post नाशिक : पाऊस पडण्यासाठी महादेवाची पिंड पाण्यात बुडवून साकडे appeared first on पुढारी.