नाशिक : पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पाच दिवसांच्या गणरायला गणेशभक्तांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मनपा प्रशासनाने चोख नियोजन केले होते. यावेळी गणेशभक्तांनी प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन न करता, त्या मनपा कर्मचार्‍यांकडे दान केल्या. यावेळी मनपा प्रशासनाने विविध ठिकाणी विसर्जन केंद्रे उपलब्ध करून दिली होती.

बहुतेकांच्या घरी बाप्पा 10 दिवसांसाठी विराजमान होतात. मात्र, काही नागरिकांकडे दीड, तर काहींकडे पाच दिवसांचा गणपती मुक्कामाला येतो. अशात आपल्या लाडक्या बाप्पाला अनेकांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. विशेषत: दुपारनंतर गणेशभक्तांनी विसर्जनस्थळी गर्दी केल्याचे दिसून आले. मनपा प्रशासनाने शहरातील बहुतांश भागांमध्ये पाण्याचे कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले होते. या ठिकाणी कर्मचार्‍यांचीही नेमणूक करण्यात आली होती. त्याचबरोबर निर्माल्यासाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. भक्तांनी निर्माल्य नदीपात्रात न टाकता, निर्माल्यपात्रातच टाकावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले होते.

अनेकांनी घरीच केले बाप्पाचे विसर्जन
बहुतांश गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे घरीच विसर्जन केले. यंदा अनेकांनी शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य दिले. अशात या मूर्ती घरीच विसर्जित करण्यात आल्या. अनेक गणेशभक्तांनी घरीच मोठ्या पाण्याच्या टाकीत फुलांच्या पाकळ्या टाकत विसर्जनाची व्यवस्था केली होती. आपल्या बाप्पाला निरोप देण्यापूर्वी डीजेच्या तालावर ठेका धरत या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिक : पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप appeared first on पुढारी.