नाशिक : वैभव कातकाडे
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यात ९९५ कामांना मंजुरी देण्यात आली असली, तरी अद्याप १५ तालुके मिळून अवघी ७७ कामे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही सर्वाधिक म्हणजे १७५ कामे दिंडोरी तालुक्यात मंजूर आहेत. मात्र, सध्या फक्त २ कामे सुरू आहेत, तर पालकमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यासाठी या योजनेंतर्गत १४५ कामे मंजूर असून, त्यातही अवघी ७ कामे सुरू असल्याने पाणंदच्या रस्त्यांची जिल्ह्यात कासवगतीने वाटचाल होत असल्याचे समोर आले आहे.
ही योजना राबविण्याबाबत तालुका स्तरावर गटविकास अधिकारी निर्णय घेत असतात. ना. दादा भुसे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत याबाबत नाराजी व्यक्त केली होती. असे असूनही यामध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. २० डिसेंबर २०२२ च्या अहवालानुसार, जिल्ह्यात ९९५ कामे मंजूर होती, त्यापैकी ३१३ कामांना तांत्रिक मान्यता आणि २८६ कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि अवघ्या ७७ कामांना सुरुवात झाली आहे. राज्यातील शेत रस्ते हे अन्य महामार्गाएवढेच महत्त्वाचे असतात. शेतात पीक तयार होताच ते काढून योग्य ठिकाणी साठविले गेले पाहिजे किंवा बाजारात विकले गेले पाहिजे. परंतु रस्ता नीट नसल्यामुळे शेतकऱ्यांना ते करणे शक्य होत नाही. पावसाळ्यात निघणारी पिके आर्थिकदृष्ट्या कितीही फायदेशीर असली, तरी रस्त्याअभावी ती विकण्याचा विचार शेतकऱ्यांना करता येत नाही. पाणंद रस्त्याची अनुपलब्धता हा यातील मोठा अडथळा आहे. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांचा विचार करता राज्य शासनाने ही योजना सुरू केली होती. त्यात शेत पाणंद रस्ते उच्च गुणवत्तापूर्ण आणि बारमाही वापरण्यायोग्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे शेत पाणंद रस्ते योजना राबविण्याबाबत २७ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयामध्ये रस्ते गुणवत्तापूर्ण तयार करण्यासाठी सूचनाही देण्यात आल्या होत्या.
या सूचनांमध्ये एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे रस्ते या प्रवर्गात ग्रामीण रस्ते व हद्दीचे ग्रामीण रस्ते म्हणजेच गाव नकाशामध्ये दोन भरीव रेषांनी दाखविलेले असून या रस्त्याची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट केलेली नाही. ग्रामीण गाडीमार्ग म्हणजे गाव नकाशामध्ये दुबार रेशमी दाखविलेले असून, ज्या भूमापन क्षेत्रामधून जाते त्यामध्ये पोटखराब म्हणून दर्शविलेले आहे, अशा रस्त्यांची नोंदणी साडेसोळा ते २१ फूट आहे. पायमार्ग म्हणजे गाव नकाशामध्ये तुटक रेषेने दर्शविलेले असून, ज्या भूमापन क्षेत्रामधून जातो त्यामध्ये पोट खराब म्हणून दर्शवलेले आहे अशा रस्त्यांची रुंदी सव्वाआठ फूट आहे. शेतावर जाण्याची पायमार्ग व गाडीमार्ग या संवर्गामध्ये हे रस्ते नकाशावर दर्शविलेले नाहीत. परंतु, वाद निर्माण झाल्यास अशा रस्त्यांबाबत निर्णय देण्याचे अधिकार कलम १४३ नुसार तहसीलदारांना दिलेले आहेत. त्यानुसार वहिवाटीचे असलेले रस्ते, इतर ग्रामीण रस्ते या संवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना या ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग किंवा उपविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा उपविभाग तसेच ज्या ठिकाणी वनजमीन असेल, तेथे वनविभाग अंमलबजावणी करत आहे.
तालुका कामांची संख्या कामे सुरू
बागलाण ९४ १४
चांदवड १३ २
देवळा ३० १
दिंडोरी १७५ २
इगतपुरी ३३ ५
कळवण ४० ५
मालेगाव १४१ ७
नांदगाव ८९ २
नाशिक ५६ ०
निफाड १३० १८
सिन्नर ६३ ७
सुरगाणा २५ २
त्र्यंबकेश्वर १५ २
येवला ९१ १०
एकूण ९९५ ७७१
हेही वाचा:
- धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, फेसबुक पोस्ट करत दिली तब्येतीची माहिती
- नगर : डीवायएसपी सातव यांची साकूरमध्ये ताफ्यासह एन्ट्री
- Jaydev Unadkat : जयदेव.. जयदेव… जय उनाडकट!
The post नाशिक : पाणंदच्या रस्त्यांची कासवगतीने वाटचाल; मंजूर कामांची संंख्या ९९५, सुरू मात्र ७७ appeared first on पुढारी.