नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिककरांवरील पाणीकपात तूर्त लांबणीवर पडली असली, तरी जायकवाडीला विसर्गानंतर धरणांतील शिल्लक जलसाठा जुलै २०२४ अखेरपर्यंत पुरविण्याचे फेरनियोजन महापालिकेला करावेच लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मे-जून महिन्यांत सोसावी लागणारी पाणीटंचाईची झळ सुसह्य करण्यासाठी गंगापूर धरणात चर खोदून मृतसाठा जॅकवेलपर्यंत आणण्याची व्यवस्था केली जाणार आहे. चर खोदण्यापूर्वी सर्वेक्षण केले जाणार आहे.
मेंढेगिरी समिती अहवालाचा आधार घेत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक व अहमदनगरच्या धरणांमधून जायकवाडी धरणासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले. याविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतरही नाशिक आणि नगरला दिलासा मिळू शकला नाही. नाशिक आणि नगरच्या धरणांतून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. दि. १५ ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी महापालिकेने गंगापूर धरण समूहातून ४४००, मुकणे धरणातून १६००, तर दारणा धरणातून १०० असे एकूण ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली होती; परंतु जायकवाडीला पाणी सोडल्याने आता महापालिकेला केवळ ५३०४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्याची भूमिका जलसंपदा विभागाने घेतली आहे.
उपलब्ध पाणी आरक्षण दि. ३१ जुलै २०२४ पर्यंत पुरविण्यासाठी आठवड्यातील दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागातर्फे आयुक्तांसमोर सादर झाला होता; परंतु राजकीय दबाव तसेच अवकाळी पावसामुळे वहन तुटीचे पाणी न सोडण्याची मागणी जलसंपदा विभागाने अंशत: मान्य केल्यानंतर सुमारे ४०० दशलक्ष घनफूट पाण्याची विसर्गातून बचत झाली आहे. हे बचत झालेले पाणी नाशिककरांना मिळण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतर तूर्त पाणीकपात महिनाभर लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी घेतला आहे.
चर खोदण्यासाठी सर्वेक्षण
पाणी आरक्षणात ७८६ दशलक्ष घनफुटाची कपात झाल्याने संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेत गंगापूर धरणातील मृत साठा जून-जुलैत उचलण्याची वेळ महापालिकेवर येऊ शकते. मृत साठा आणि महापालिकेच्या पंपिंग स्टेशनमधील जॅकवेलच्या दरम्यान मोठा खडक असल्यामुळे हे पाणी जॅकवेलपर्यंत आणणे शक्य होणार नसल्याने हा खडक फोडून जॅकवेलपर्यंत चर खोदावी लागणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कात्रीत हे काम अडकू नये, यासाठी जानेवारीतच सर्वेक्षण करून प्रस्ताव मंजूर करण्याचे नियोजन प्रशासनातर्फे केले जात आहे. गंगापूर धरण हे मातीचे धरण आहे. खडक फोडताना धरणाला धोका उत्पन्न होऊ नये, यासाठी सर्वेक्षण करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिकेला जलसंपदा विभागाने दिलेले पाणी आरक्षण मागणीपेक्षा कमी आहे. त्यामुळे जून-जुलैत नाशिककरांवर पाणीसंकट कोसळण्याची शक्यता असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून धरणातील मृतसाठा उचलण्यासाठी जॅकवेलपर्यंत चर खोदण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
– रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.
हेही वाचा :
- पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार!
- Karnataka Lokayukt : कर्नाटकात लोकायुक्तांचा दणका; ६३ ठिकाणी छापे
- Lakhbir Singh Rode : खलिस्तानची मागणी करणाऱ्या भिंद्रनवालेच्या पुतण्याचा पाकिस्तानात अंत
The post नाशिक : पाणीकपातीचे संकट टाळण्यासाठी गंगापूर धरणात खोदणार चर appeared first on पुढारी.