
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याचा खरीप हंगाम व जलशयांमधील मर्यादित पाणीसाठ्यासह अन्य विषयांवर पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि.८) आढावा घेणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या बैठकीमध्ये ना. भुसे नाशिक शहरातील पाणीकपातीवर निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या शहरवासीयांच्या नजरा बैठकीकडे लागल्या आहेत.
पालकमंत्री भुसे यांनी सोमवारी (दि. ८) विविध विषयांवर बैठकांचे सत्र बोलविले आहे. सकाळी ११ पासून सुरू होणाऱ्या आढाव्यावेळी जिल्ह्यातील आगामी खरीप हंगामावर सविस्तर चर्चा हाेणार आहे. त्यानंतर मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था व जिल्ह्यातील अनुकंपा भरतीबाबतची बैठक पार पडणार आहे. यंदाचे वर्ष हे अल निनो वादळाचे ठरण्याची भीती असून, त्यामुळे मान्सून आगस्टपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. अशावेळी टंचाईचे संकट उभे राहू शकते. त्याच पार्श्वभूमीवर दुपारी ४ वा. पालकमंत्री भुसे हे जिल्ह्यातील पाणीटंचाईचा सविस्तर आढावा घेतील. सायंकाळी पावणेपाच वाजता त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कल परिसरातील जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीची भुसे पाहणी करणार आहेत.
टंचाईच्या अनुषंगाने जिल्ह्यातील जलायशांमधील उपलब्ध पाणीसाठा व यंत्रणांकडून ऑगस्टपर्यंतचे पाण्याचे नियोजन यावर बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच यावेळी नाशिक शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करण्याबाबतही पालकमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. त्यामुळे शहरवासीयांची धाकधूक वाढली आहे.
हेही वाचा :
- नाशिक : पोलिस करताय गुन्हेगारांच्या कुंडलीची मांडणी, कुटुंबासह मालमत्ता रडारवर
- म्युझियममध्ये हवा आहे सफाई कामगार! पात्रता किमान ग्रॅज्युएट!
- शंभरावर सराईतांची झाडाझडती; खुनाच्या घटनेनंतर मुंढवा पोलिस ‘अॅक्शन मोड’वर
The post नाशिक : पाणीकपातीवर आज पालकमंत्र्यांकडून निर्णय? appeared first on पुढारी.