Site icon

नाशिक : पाणीपट्टी वसुलीसाठी अभियंत्यांचे खास पथक, थकबाकीदारांना ‘इशारा’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आर्थिक वर्ष संपण्यास अवघा एक महिना हाती असल्याने कर थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या विविध कर विभागाकडून प्रयत्न सुरू असून, पाणीपट्टी वसूल करण्यासाठी अभियंत्यांंचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. थकबाकीदारांनी थकीत कर जमा न केल्यास पथकांमार्फत संबंधितांवर दंडात्मक कारवाईबरोबर त्यांची नळजोडणी तोडली जाणार आहे.

येत्या ३१ मार्चअखेरपर्यंत नियमित करवसुलीबराेबरच थकबाकी वसुली करण्यासाठी कर विभागाकडून नियोजन सुरू आहे. घरपट्टीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मनपाला फारशी कसरत करावी लागणार नसली तरी पाणीपट्टीसाठी मात्र मनपाला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठीच विविध कर विभागाने थकबाकीदारांकडे मोर्चा वळविला असून, वसुलीसाठी विविध कर विभाग आता शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व उपअभियंत्यांच्या माध्यमातून पाणीपट्टी वसुली करणार आहे. विशेष वसुली मोहिमेत विभागीय अधिकारी हे समन्वयकाची भूमिका पार पडतील. त्यानुसार ते स्वतः संबंधित अभियंत्यांसोबत थकबाकीदारांना भेटी देतील. प्रत्येक अभियंत्यासोबत त्या-त्या विभागातील दोन कर्मचारी उपलब्ध असतील. नळजोडणी खंडित करण्याबरोबरच थकबाकीदाराविरोधात पाणीपुरवठा विभाग फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

अभियंत्यांचे असे असेल पथक

पाणीपट्टी वसुलीकरिता नाशिक पश्चिम विभागात उपअभियंता संजय अडेसरा, कनिष्ठ अभियंता राजेंद्र घेगडमल व दयानंद अहिरे यांची नियुक्ती केली आहे. पूर्व विभागात उपअभियंता एच. पी. नाईक. कनिष्ठ अभियंता एस. एन. गवळी. एस. एम .शिंदे व शाखा अभियंता प्रेमचंद पवार यांची नियुक्ती आहे. पंचवटी विभागामध्ये शाखा अभियंता आर. जी. चव्हाण. कनिष्ठ अभियंता जी. के. गोरडे, बागूल यांची नियुक्ती केली आहे. सिडको विभागात उपअभियंता जी. पी. पगारे. कनिष्ठ अभियंता डी. के. शिंगाडे. सहायक कनिष्ठ अभियंता जितेंद्र चव्हाण तर नाशिकरोड विभागात उपअभियंता राजेंद्र ठाकरे. कनिष्ठ अभियंता पी. के. गांगुर्डे, कनिष्ठ अभियंता ए. एल. जेऊघाले व एजाद शेख यांच्यावर जबाबदारी आहे. सातपूर विभागासाठी उपअभियंता रवींद्र पाटील व कनिष्ठ अभियंता शोएब मोमीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

.. तर सातबाऱ्यावर बोजा चढविणार

पाणीपट्टीची थकबाकी संबंधित मालमत्ताधारकाने वेळीच भरली नाही तर अशा मालमत्तेच्या सातबाऱ्यावर थकीत कराचा बोजा चढविण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित मालमत्ताधारकास संबंधित मालमत्तेचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करता येणार नाहीच. शिवाय त्याच्याशी संबंधित काही प्रमाणपत्र वा कागदपत्रे लागल्यास आधी थकबाकी भरावी लागणार आहे. त्याशिवाय दाखलेच मिळणार नाहीत.

हेही वाचा :

The post नाशिक : पाणीपट्टी वसुलीसाठी अभियंत्यांचे खास पथक, थकबाकीदारांना 'इशारा' appeared first on पुढारी.

Exit mobile version