नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरात साडेचार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, भामट्यांनी त्यास १५ ते २२ ऑक्टोबरदरम्यान गंडा घातला. भामट्याने त्यास व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवून पार्टटाइम जॉबबद्दल माहिती दिली. त्यानुसार पीडित व्यक्तीस टेलीग्रामवर लिंक पाठवून वेगवेगळे काम करण्यास सांगितले. ही कामे केल्यानंतर पैसे मिळतील असे आमिष भामट्यांनी दाखवले. त्यानुसार पीडित व्यक्तीने काम पूर्ण केले. तसेच भामट्यांनी ऑनलाइन खात्यात पैसे जमा होत असल्याचे सांगितले. त्या मोबदल्यात भामट्यांनी पीडित व्यक्तीकडून वेगवेगळी कारणे देत ४ लाख ४० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. पीडित व्यक्तीने ऑनलाइन खात्यावरील पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता ते मिळाले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित व्यक्तीने संपर्क साधणाऱ्या व्यक्तींसह ज्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले. त्यांच्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून साडेचार लाखांचा गंडा appeared first on पुढारी.